मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल व्यक्त केला आनंद

by Team Satara Today | published on : 04 October 2024


सातारा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने गेली आठ वर्षे सातत्याने केलेल्या प्रयत्नांना ३ ऑक्टोबरला यश मिळाले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला. या यशाचा आनंद शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी शिवतीर्थावरील श्री.छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांसमोर मसाप, शाहुपुरी शाखा आणि साहित्यिकांच्यावतीने साखर वाटप करुन साजरा करण्यात आला.

यावेळी मसाप पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, मसाप पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, किशोर बेडकिहाळ, डॉ.संदीप श्रोत्री, डॉ. उमेश करंबेळकर, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, ॲड. चंद्रकांत बेबले, मसाप, पुणे सातारा जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार सावंत, वजीर नदाफ, जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांनी अहवाल देऊनही त्यावर कार्यवाही होत नव्हती. त्यासाठी सर्वप्रथम मसाप शाहुपुरी शाखेने आवाज उठवला पंतप्रधान मोदींना एक लाख पत्रे पाठवणे, दिल्ली येथे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद ुकुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे धरणे आंदोलन करुन पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात आले. राज्यातील सर्व राजकीय नेत्यांशी, आमदार, खासदारांशी पत्रव्यवहार करण्यात आला. याबाबत सातत्याने प्रशासकीय, राजकीय, न्यायालयीन पातळीवर मसाप शाहुपुरी शाखेने पाठपुरावा केला. त्याला ३ ऑक्टोबर रोजी यश प्राप्त झाले. त्याचा आनंद समस्त  सातारा जिल्हावासिय, मराठी भाषिकांच्यावतीने शुक्रवारी शिवतीर्थावरील श्री.छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर साखर वाटप करुन साजरा करण्यात आला. प्रारंभी शिवाजी महाराजांना विनोद कुलकर्णी आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अमर बेंद्रे यांनी प्रेरणा मंत्र म्हटला त्याला उपस्थितांनी साथ दिली. शिवाजी महाराजांच्या जयघोषानंतर उपस्थित मान्यवर, नागरिकांना साखर वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना मसाप पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, गेली आठ वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्याने हे यश मिळाले आहे. केंद्र सरकारने उशीरा का होईना दखल घेतली याचा आनंद आहे. दिल्लीत आ. शिवेंद्रसिंहराजे, प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली श्री.छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले होते त्यामुळे आज शिवतीर्थावर श्री.छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आवारात हा आनंद साजरा करण्यात येत आहे. जिल्हयाला ऐतिहासिक परंपरा आहे. येथून सुरु केलेल्या आंदोलनाला यश मिळते हा इतिहास आहे म्हणूनच या जिल्हयाला क्रांतीकारी जिल्हा म्हणतात. हे या आंदोलनाला मिळालेल्या यशाने पुन्हा एकदा सिध्द केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सातारा जिल्हयाने उभा केलेल्या लढयाची नोंद नक्कीच घेतली जाईल. हा दर्जा मिळाल्याद्दल जिल्हावासियांचे मी अभिनंदन करतो. मसाप, पुणेने सुध्दा या यशाबद्दल मसाप, शाहुपुरी शाखेच्या सत्काराचे नियोजन केले असून तो कार्यक्रमही लवकरच होईल. अभिजात दर्जा मिळाला असून आता ही भाषा वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सगळ्यांनी मिळून करुया असे आवाहन केले.

ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्राने आजपर्यंत जे काही मिळवले त्यासाठी संघर्ष करावा लागला हा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य असो, महाराष्ट्र राज्याची निर्मिती असो आणि आता मराठी भाषेला अभिाजात भाषेचा दर्जा असो. गेली अनेक वर्षे हा प्रश्न रेंगाळत होता परंतु दबावाचे राजकारण केल्यानंतर हा दर्जा मिळवण्यात महाराष्ट्र पुन्हा एकदा यशस्वी झाला असून त्यात मसाप शाहुपुरी शाखेचा सिंहाचा वाटा आहे. आता हा दर्जा टिकवणे, सांभाळणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून मराठी भाषेचे संवर्धन  करण्यासाठी सर्वांनी कटिबध्द होऊया, असे आवाहन केले.

जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे म्हणाले, मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मसाप शाहुपुरी शाखेने केलेली आंदोलन, केलेले प्रयत्न या सर्वांचा मी साक्षीदार आहे. या प्रयत्नात मी सोबत असल्याचा मला अभिमान वाटतो. ज्या ज्या वेळेस केंद्र, राज्यस्तरावरील नेत्यांकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण व्हायची तेव्हा विनोद कुलकर्णींंच्या सोबत मी होतो. काही दिवसांपूर्वीच राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण जिल्हा दौऱ्यावर होते त्यावेळी झालेल्या बैठकीतही आम्ही राज्यपालांकडे आपण पंतप्रधानांकडे या कामासाठी आग्रह धरावा अशी विनंती केली होती त्यानंतर आठ दिवसांतच हा निर्णय झाला. या प्रयत्नांमध्ये मी एक घटक असल्याचा मला अभिमान वाटतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सातारा जिल्हयाच्या लढ्याची इतिहासात नोंद होईल. आता भाषा टिकवणे, वाढवणे, संवर्धन करणे यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ. उमेश करंबेळकर, डॉ.संदीप श्रोत्री यांनीही मनोगते व्यक्त केली.

साखर वाटप कार्यक्रमास प्रवीण पाटील, ॲड. अरुणा पाटील-बंडगर, अमर बेंद्रे, राजू गोरे, संजय माने, संतोष यादव, सचिन सावंत, तुषार महामूलकर, गणेश निंबाळकर, महेश महामुनी, आर.डी.पाटील, सतीश घोरपडे,विनायक भोसले, जनता सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी, गुजराथी अर्बनचे अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सातारकर उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा
पुढील बातमी
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या