सातारा : उद्या सोमवार दि. १ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने आज रविवार दि. ३० नोव्हेंबर जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा डे ठरला. आज सकाळपासूनच जिल्ह्यातील निवडणुका होणाऱ्या नगरपालिका हद्दीत पदयात्रा, कोपरासभा, मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठीवर उमेदवारांनी चांगलाच भर दिल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील ९ नगरपालिका १ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी जिल्ह्यात उपस्थिती लावल्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली.
सातारासह जिल्ह्यातील कराड, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई, मलकापूर या नगरपालिकांसह मेढा नगरपंचायतीसाठी दि. २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यात नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. महायुतीमध्ये संधी मिळत नसल्याचे लक्षात येताच सुरुवातीपासूनच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या निवडणुकांची रणनीती तयार करत तशी वाटचाल सुरू केली. थोड्याच दिवसात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मलकापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना गळाला लावण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष, आ. अतुल भोसले यांना यश मिळाले. काही दिवसातच खा. नितीन पाटील आणि ना. मकरंद पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला.
फलटणमध्ये आश्चर्यरित्या राजे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाशी हातमिळवणी करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ना. मकरंद पाटील यांनी अत्यंत चाणाक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या भगिनींना आपल्या गोटात सामावून घेतले. रहिमतपूर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाशी हातमिळवणी केली. थोडक्यात जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी वेळात सोईस्करपणे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. १५ दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वेळा रहिमतपुर येथे उपस्थिती लावत सुनील माने यांना एक प्रकारे ताकद दिली. दुसरीकडे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट रहिमतपूर आणि वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालत मदन भोसले यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला.
प्रचाराला अवघे काही तासात बाकी....
सातारा शहरासह नगरपालिका निवडणुका होऊ घातलेल्या शहरांमध्ये आज सकाळपासूनच विविध उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. प्रभागा प्रभागात रिक्षा, ॲपे रिक्षा उमेदवारांचा प्रचार करत दिवसभर फिरताना दिसून आल्या. प्रचाराला अवघे काही तास बाकी राहिल्यामुळे जवळपास सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचारात कुठेही कुचराई राहणार नाही याकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसून आले.
विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका
जिल्ह्यामध्ये अनेक वर्षानंतर नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यातच जिल्ह्याला दोन खासदार आणि तीन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. काही राजकीय पक्ष व गटांमध्ये मतभेद असले तरी या निवडणुकीत वैयक्तिक टीकाटिप्पणी न होता प्रचारात विकासाच्या मुद्द्याकडे अधिक लक्ष दिल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे या नेत्यांनी एकमेकांवर राजकीय चिखल फेक न करता विकासावर भाष्य केल्यामुळे आजही सातारा जिल्हा स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या ध्येय - धोरणावर चालतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे यांची प्रचाराकडे पाठ?
सातारा जिल्हा आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात सर्वाधिक अधिक सातारा जिल्ह्यात झाला होता. त्यामुळे सातारा जिल्ह्यात एखादी राजकीय घडामोडी सुरू आहे आणि त्यामध्ये शरद पवार यांचा सहभाग नाही, असे कधीही पाहायला मिळाले नव्हते. सातारा जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मात्र शरद पवार अथवा खा. सुप्रिया सुळे यांची एकही प्रचारसभा झाली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.