कौतुकाचा पेढा आणि शिवतीर्थावर अभिवादन

जिल्ह्यात भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांचे जंगी स्वागत

by Team Satara Today | published on : 16 May 2025


सातारा : कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांची भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून नवीन कारकीर्द सुरू झाली आहे. जिल्ह्याने जिल्हाध्यक्ष पदाच्या रूपाने संपूर्ण कार्यक्षेत्र त्यांना बहाल केल्याने भोसले यांच्या कारकिर्दीला नवे आयाम मिळणार आहेत. नूतन जिल्हाध्यक्षांचे सातार्‍यात सारोळा पूल ते सातारा यादरम्यान ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. सातारा जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर सातार्‍यात शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह विविध मान्यवरांच्या पुतळ्याला अभिवादन करत डॉ. अतुल भोसले जलमंदिर पॅलेस येथे दाखल झाले. खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना कौतुकाचा पेढा भरविला आणि आगामी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पदाची खांदेपालट झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांना ताकद देणे आणि पक्ष संघटन मजबूत करणे अशी आपली कामाची दिशा असणार असल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तत्पूर्वी सातार्‍यात सकाळी 11 ते दुपारी दोन या दरम्यान सारोळा, शिरवळ, खंडाळा, जोशीविहीर, वाई, आनेवाडी टोल नाका, लिंब खिंड, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे भाजप कार्यकर्त्यांकडून भोसले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सातार्‍यात आल्यानंतर डॉ. अतुल भोसले यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शाहू चौकातील घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर लहुजी वस्ताद साळवे, गोलबाग येथील प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ते जलमंदिरवर दाखल झाले. तेथे त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. खा. उदयनराजे भोसले यांनी शाल व पुष्पगुच्छ व शिवप्रतिमा देऊन डॉ. अतुल भोसले यांचे स्वागत केले. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, लोकसभा संयोजक सुनील काटकर हे उपस्थित होते. उदयनराजे यांनी डॉ. अतुल भोसले यांची गळाभेट घेऊन त्यांना कौतुकाचा पेढा भरवत आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी डॉ. अतुल भोसले यांची पत्रकार परिषदेपूर्वी शासकीय विश्राम गृहात भेट घेतली व त्यांना नवीन जबाबदारी च्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आमदार डॉ. अतुल भोसले भाजपच्या कार्यकर्त्यांसह शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेथून कराडमध्ये पोहोचल्यानंतर कराडमध्ये त्यांची जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. कराडमध्येही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत झाले. दत्त चौकातून डॉ. अतुल भोसले आपल्या कार्यकर्त्यांसह निवासस्थानी कौतुकाच्या जल्लोषात रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पेरूची पाने सकाळी रिकाम्या पोटी चावून खाल्ल्याने मिळतात भरपूर फायदे
पुढील बातमी
माहुलीतील समाधी स्मारकांच्या आराखड्याचे सातारमध्ये सादरीकरण

संबंधित बातम्या