सुदेष्णाची ‘सुवर्ण’ धाव; साताऱ्याच्या शिरपेचात तुरा !

दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

by Team Satara Today | published on : 17 October 2025


वाढे : जावळी तालुक्यातील खर्शी गावची धावपटू सुदेष्णा शिवणकर हिने राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत महाराष्ट्रासह साताऱ्याची मान अभिमानाने उंचावली आहे. नुकत्याच वारंगळ (तेलंगणा) येथे झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देशातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून आपले स्थान पक्के केले. तिची २४ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रांची (झारखंड) येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

या विजयामुळे सुदेष्णाने वर्षातील तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची हॅट् ट्रिक पूर्ण केली आहे. तिने उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत १०० मीटरमध्ये सुवर्णपदक, रांची येथील सीनियर नॅशनल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप १०० मीटरमध्ये रौप्य तर गुरुवारी (दि. १६) वारंगळ येथे झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत १०० मीटरमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.

केवळ १३व्या वर्षी प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्स खेळाचा प्रवास सुरू करणाऱ्या सुदेष्णाने आज राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. नऊ वर्षांच्या अथक परिश्रम आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणातून तिने ज्युनियर नॅशनल, आंतरविद्यापीठ, खेलो इंडिया तसेच सीनियर स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे. वारंगळ येथील हे सुवर्णपदक तिच्या कारकिर्दीतील ६२वे पदक ठरले आहे. यापूर्वी तिने कोलंबिया (दक्षिण अमेरिका) येथील जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप आणि चायना (चेंगडू) येथील जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

सुदेष्णाच्या सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी यशामागे प्रशिक्षक बळवंत बाबर, वडील हणमंत आणि प्रतिभा शिवणकर यांचे योगदान मोलाचे आहे. सुदेष्णाला आयकर विभागात क्रीडा कोट्यातून टॅक्स असिस्टंट म्हणून नियुक्ती मिळाल्याने तिच्या क्रीडा प्रवासाला नवी दिशा आणि स्थैर्य प्राप्त झाले आहे.

सुदेष्णा शिवणकरचे आजचे हे यश म्हणजे तिच्या अथक मेहनतीचे, परिश्रमाचे आणि आई-वडिलांच्या अखंड पाठिंब्याची फलश्रुती आहे. एवढ्या मोठ्या स्तरावरचा खेळाडू दोन-चार वर्षांत तयार होत नाही; त्यामागे वर्षानुवर्षांची शिस्त, चिकाटी, त्याग दडलेले असतात. सुदेष्णाचे हे यश त्या सर्व प्रवासाचे उज्ज्वल फळ आहे. - बळवंत बाबर, प्रशिक्षक



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाठार येथे महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे; शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी संतप्त

संबंधित बातम्या