साताऱ्यात पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची अफवा; वाहनधारकांची पंपांवर झुंबड

by Team Satara Today | published on : 26 March 2026


सातारा : मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या बातम्या येत असतानाच, आता पेट्रोल आणि डिझेलचाही तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. या चुकीच्या माहितीमुळे सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर काल सकाळपासूनच वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. प्रत्यक्षात जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

​गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया आणि विविध व्हॉट्सॲप ग्रुप्सवर इंधन टंचाई भासणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या मेसेजमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि प्रत्येकाने आपली दुचाकी व चारचाकी वाहने फुल्ल करून घेण्यासाठी पंपांकडे धाव घेतली. अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर मोठी कोंडी निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी वाहनधारकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले, तर काही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंप चालकांना मोठी कसरत करावी लागली. इंधनाचा तुटवडा होणार या भीतीपोटी लोक गरजेपेक्षा जास्त इंधन भरून घेत असल्याने ही परिस्थिती ओढावली असल्याचे चित्र दिसत होते.

​दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष रितेश रावखंडे यांनी सांगितले की, सध्या केवळ व्यावसायिक एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात काही अंशी अडचणी आहेत, मात्र घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळीत कोणताही व्यत्यय आलेला नाही. केवळ सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे नागरिक विनाकारण गोंधळून गेले आहेत. त्यामुळे जनतेने अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. इंधन कंपन्यांकडून नियमितपणे पुरवठा होत असताना नागरिकांनी विनाकारण गर्दी केल्याने पंपांवरील कर्मचाऱ्यांवरही कामाचा प्रचंड ताण येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नगरपरिषद इमारती व सभागृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ठराव बहुमताने मंजूर; फलटण नगरपरिषदेच्या सभेत हद्दवाढी, स्टेडियम उभारणीसह ४६ ठराव मंजूर

संबंधित बातम्या