पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या; माण तालुक्यातील हिंगणी येथील घटना

by Team Satara Today | published on : 08 October 2025


माण : माण तालुक्यातील हिंगणी गावात बुधवारी पहाटे हृदयद्रावक घटना घडली. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

हिंगणी गावच्या हद्दीत असलेल्या आसळ ओढा परिसरातील घुटूकडे वस्ती येथे ही घटना घडली. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास अनिता बंडु घुटूकडे घरात मृतावस्थेत आढळून आल्या. तर त्याच घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचे पती बंडू अंकुश घुटूकडे (वय ४०) यांनी रबरी बेल्टच्या साहाय्याने पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे आढळले. प्राथमिक माहितीनुसार, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत बंडु घुटूकडे यांनी तिच्या डोक्यात लाकडी दांडा असलेल्या लोखंडी घनाने प्रहार करून तिचा खून केला. 

त्यानंतर त्यांनी स्वतः विषारी औषध पिऊन रबरी बेल्टने पत्र्याच्या शेडच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत, ठसे तज्ज्ञ पथक आणि श्वानपथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानेश्वर वस्ताद झिमल (वय ३१) यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत. या घटनेमुळे हिंगणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात नवे उद्योग उभारणीचे मार्ग मोकळे; 11 ऑक्टोबर रोजी 'सेमीव्हिजन २०२५' सेमिनारचे आयोजन
पुढील बातमी
फलटणला अनेक ठिकाणी महिला आरक्षण पडल्याने इच्छुक अडचणीत; नगरपरिषद निवडणुकीसाठी 13 प्रभागांची आरक्षण निश्चिती

संबंधित बातम्या