मणिपूर प्रकरणाचा जिल्हा महिला ओबीसी संघटनेच्या वतीने निषेध

by Team Satara Today | published on : 24 July 2023


सातारा : मणिपूर येथे तीन महिन्यापासून महिलांवर अत्याचार होत असून त्यामुळे देशाची मान खाली गेली आहे. मणिपूरमध्ये मैथली समुदाय हा हिंदू आहे. कुकी समुदाय हा अनुसूचित जमातीमध्ये आहे. याच जमातीमधील महिलांची नग्न धिंड येथे काढण्यात आली. या प्रकरणाचा सातारा जिल्हा ओबीसी महिला संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. त्याचे निवेदन सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
संघटनेच्या अध्यक्ष सुनीता दीक्षित, कार्याध्यक्ष शांता जानकर, जिल्हा संघटनेच्या महासचिव दिपाली लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाती जगताप, कविता लोहार, अर्चना दीक्षित, रेश्मा सुतार, शोभा मोरे या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद आहे की, देशातील स्त्रियांना घटनेने अधिकार दिले आहेत. परंतु सत्ता मिळवण्यासाठी त्यांची धिंड काढली व खालच्या जातीतील महिलांच्यावर अत्याचार सुरू आहेत. येथे पंतप्रधान न्याय देणार नाहीत ते न्याय देणाऱ्या पक्षाचेच नाहीत. म्हणून आम्ही महिला अधिकारांचे रक्षण करावे, अशी मागणी करत आहोत. घटनेने महिलांना अधिकार दिलेले असताना पुरुष त्याचा अवमान करत असेल तर पक्षातील स्त्रियांनी या अत्याचाराचा निषेध करून अशा राजकीय पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम देशातील 50 टक्के महिलांनी करावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात राष्ट्रपतींनी लक्ष घालून मणिपूरचे सरकार बरखास्त करावे व राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, असे निवेदन यावेळी करण्यात आले. संबंधित आंदोलक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या प्रकरणाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई पंचायत समितीमध्ये वेळेत पेन्शन मिळत नसल्याची तक्रार
पुढील बातमी
सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

संबंधित बातम्या