सातारा : सातार्यातील पाच दशकाची परंपरा असणार्या सातारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समर्थ रामदास स्वामी यांचे नाव देण्यात आले आहे. हे नाव तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य कार्यकारणी रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत खंडाईत, संत रोहिदास सामाजिक संस्थेचे गणेश कारंडे, विजयराव निकम, पार्थ पोळके यांच्या स्वाक्षर्या आहेत.
या निवेदनात नमूद आहे की, सातार्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही जुनी आणि सुप्रसिद्ध आहे. या संस्थेची कोणतीही मागणी नसताना औद्योगिक शैक्षणिक संकुलाची नावे बदलण्याचा निर्णय करण्यात आला. या शिक्षण क्षेत्रामध्ये समाजामध्ये अनेक नामवंत घडले असतील तर त्यांचे नाव देण्याऐवजी कोणालाही विश्वासात न घेता शासनाने या संस्थेला संत रामदास स्वामी यांचे नाव दिले आहे. या निर्णयामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारांना मानणार्या जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करून सदरचे नाव पुसून टाकावे, याबाबत संबंधितांना उचित कार्यवाहीचे निर्देश द्यावे आणि या क्षेत्रात ज्या नामवंतांचे योगदान आहे त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
छत्रपती शिवरायांच्या राजधानीत सांस्कृतिक विद्रूपीकरण जाणीवपूर्वक सुरू आहे. ते तातडीने थांबवावे. अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.