दहिवडी : येथील सय्यद बंधूंच्या बागेला आग लागून तब्बल १३५० झाडे भस्मसात झाली. झाडांसह साहित्य जळाल्याने साधारण दहा लाखांचे नुकसान झाले. शहरापासून हाकेच्या अंतरावर दहिवडी-फलटण रस्त्यालगत मुन्शी सय्यद, शब्बीर सय्यद व इतरांनी विविध झाडांची लागवड केली आहे. या ठिकाणी २८ एप्रिलला दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. जोराचा वारा व कडक उन्हामुळे आगीचा भडका उडाला.
घरातील, शेजारी व गावातील मिळून २० ते २५ जणांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. या आगीने पाच ते सहा एकर क्षेत्रावरील सर्व झाडे भस्मसात केली. या आगीत शेवगा- ९५० झाडे, केळी- २६० झाडे, चिक्कू- सहा झाडे, आंबा- दोन झाडे, आवळा- सात झाडे, रामफळ- पाच झाडे, लिंबू- २० झाडे,
सीताफळ- ११० झाडे, नारळ- पाच झाडे, चंदन- १०३ झाडे, सागवान- पाच झाडे, ठिबकचे ४८ बंडल, पीव्हीसी पाइप दोन इंची ११०० फूट, काळी गोटा पाइप दीड इंची ६०० फूट हे सर्व जळून खाक झाले. एकूण नऊ लाख ४० हजार रुपयांचे या आगीत नुकसान झाले. तहसीलदार विकास अहीर यांच्या आदेशानुसार तलाठी भोसले यांनी या जळीत नुकसानीचा पंचनामा केला आहे.