सातारा : तारळी धरणग्रस्तांच्या पात्र प्रकल्पग्रस्तांची प्रमाणित संकलन यादी अद्याप दुरुस्त झालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप या विषयावर निर्णय झालेला नाही. 10 फेब्रुवारी रोजी प्रकल्पग्रस्तांनी या संदर्भात आंदोलन केले होते. मात्र तरीही जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या आश्वासनानंतर पुढे काहीच घडले नाही. त्यामुळे तारळी धरणग्रस्त पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत. डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांच्यासह आंदोलकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात श्रमिक मुक्ती दलाचे दीपक भोर, जनार्दन मोरे, प्रमोद कंगटे इत्यादी आंदोलक उपस्थित होते. प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, मौजे सावरघर, काटेवाडी, तालुका पाटण तसेच तारळे धरणग्रस्तांच्या प्रकरणांमध्ये मूळ यादी प्रस्तावित झालेली नाही. तसेच काटेवाडी तालुका पाटण येथील संकलन यादी क्रमांक 82 चा बंदी दिनांक 4 12 81 चे मूळ खातेदार ज्योती लक्ष्मण मोरे हयात असताना त्यांचा थोरला मुलगा बाळकृष्ण ज्योती मोरे यांच्या नावाने संकलनात चुकीची नोंद करण्यात आली आहे. बाळकृष्ण यांची वारस व त्यांचे इतर वारसदारांचा हक्क डावलला जात आहे. ते आम्हाला जमीन व घरातून हाकलून देत आहेत, दमदाटी करत आहेत. अशा कित्येक प्रकरणांमध्ये संकलन याद्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.
त्यामुळे धरणग्रस्तांनी अशा प्रखर उन्हाळ्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संकलन यादीच्या प्रस्तावाबाबत निर्णय झाल्यास या आंदोलनामध्ये आणखीही धरणग्रस्त सामील होऊ शकतात, असा इशारा देण्यात आलेला आहे. संकलन रजिस्टर दुरुस्ती राज्य शासनाने प्राधान्य क्रमाने हाती घ्यावी आणि योग्य प्रस्ताव तयार करून धरणग्रस्तांना न्याय द्यावा. तरच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सुटतील. त्यामुळे राज्य शासनाने धरणग्रस्तांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांनी दिला आहे.