लावंघर, समर्थगाव–काशीळ व भाटमरळी उपसा सिंचन योजनांच्या निविदांना शासनाची मान्यता- ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; सातारा तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ

by Team Satara Today | published on : 07 January 2026


सातारा :  उरमोडी धरणातील पाणी सातारा तालुक्यातील लावंघर, समर्थगाव–काशीळ व भाटमरळी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून उरमोडी धरणाच्या मोठ्या पाटबंधारे सिंचन प्रकल्पांतर्गत वरील तीन उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रियेस शासनाने मान्यता दिली आहे.

उरमोडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यतेस ७ डिसेंबर २०२५ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत रु. ४४१४.२८ कोटींची मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर १० डिसेंबर २०२५ रोजी शासन मान्यता प्राप्त झाली. या सुधारीत आराखड्यानुसार सातारा, खटाव व माण तालुक्यातील एकूण २९,२०६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

लावंघर उपसा सिंचन योजना

लावंघर, शिंदेवाडी, म्हसकरवाडी, करंजे, करूण व अंबवडे या सहा गावांतील ३५५ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी सुमारे रु. ३९.८१ कोटी खर्च अपेक्षित असून ५०० अश्वशक्तीचे पंप व बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ही योजना मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

समर्थगाव–काशीळ उपसा सिंचन योजना

या योजनेमुळे ७२० हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. समर्थगावसाठी ३४५ हेक्टर तर काशीळसाठी ३७५ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. यासाठी रु. ५६.२६ कोटींची तरतूद असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ४३० अश्वशक्तीचे पंप बसविण्यात येणार आहेत. या योजना देखील मार्च २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहेत.

भाटमरळी उपसा सिंचन योजना

भाटमरळी उपसा सिंचन योजनेच्या निविदा प्रक्रियेसही शासनाने मान्यता दिल्याने या परिसरातील सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या तिन्ही योजनांच्या निविदांना मान्यता मिळाल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतकऱ्यांनी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार व्यक्त केले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दर्पण पुरस्कार हा पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान - ना. प्रा. राम शिंदे : साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण यांचा पुरस्काराने गौरव
पुढील बातमी
समाजमाध्यमांद्वारे साहित्य संमेलनाचा डंका ‘अटकेपार’- तब्बल साडेसात कोटी साहित्य रसिकांनी समाजमाध्यमांद्वारे अनुभवला मायमराठीचा जागर

संबंधित बातम्या