नाशिक : दिंडोरी तालुक्यातील इंदोरे परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना हा अपघात घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरे गावातील सुनील दरगुडे आणि त्यांचे कुटुंबीय खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनानंतर घरी परतत होते. दरम्यान, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. विहीर पूर्ण भरलेली असल्यामुळे वाहनातील कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
या दुर्घटनेत दरगुडे कुटुंबातील सदस्यांसह जवळच्या नातेवाईकांचा समावेश असलेल्या एकूण ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य तातडीने हाती घेण्यात आले; मात्र सर्वांना वाचवण्यात अपयश आले.
या घटनेचा प्राथमिक अंदाज चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा वर्तविण्यात येत असून, नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असून, या दुर्घटनेमुळे इंदोरे गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.