जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

by Team Satara Today | published on : 06 March 2026


मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती जाहीर केली आहे. सध्या ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची नियुक्ती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी (दि. ५ मार्च) रात्री देशातील विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून जिष्णू देव वर्मा यांची ओळख आहे. त्यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१८ ते २०२३ या कालावधीत ते त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. या काळात त्यांच्या ताब्यात वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती होती.

ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५७ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९९० साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्या सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली.

१९९६, १९९८ आणि १९९९ या तीन वेळा त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या काळात त्रिपुरात डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्याचे काम त्यांनी केले.

राजकारणाबरोबरच जिष्णू देव वर्मा हे कलाप्रेमी म्हणूनही ओळखले जातात. त्यांना साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्राची आवड आहे. ते कवी आणि लेखक म्हणूनही परिचित असून बॅडमिंटन खेळाशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. विविध क्रीडा संघटनांमध्येही त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड २० मार्चला; ११ पंचायत समित्यांतील सभापती-उपसभापती निवड १६ मार्च रोजी
पुढील बातमी
अर्थसंकल्पात राज्यात एज्युसिटी उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय - प्रा. डॉ. विजय कुंभार, महाराष्ट्राला शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनविण्याच्या दिशेने पाऊल महत्त्वपूर्ण

संबंधित बातम्या