कल्याण डोंबिवली : महापालिका निवडणुकीतील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून बूथवरही कार्यकर्ते आणि पदाधिकारी नियोजनबद्ध काम करताना दिसून येतात. मात्र, काही ठिकाणी मतदारांना आमिष आणि पैसे देण्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत.
भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चक्क पैशांचे वाटप केल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवलीतील एका महिलेच्या घरी पैशांची पाकिटे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान पांढऱ्या पाकिटात 3000 रुपये म्हणजे 500 रुपयांच्या 6 नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात असल्याचे निदर्शनास आले. डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपकडून तीन हजार रुपयांची पाकीटे नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात येत आहेत.
येथील शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ हात पकडल्याने हे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या महापालिकेतही भाजप उमेदवाराकडून पैशांचे अशाप्रकारे होत असलेले वाटप चर्चेत आहे. दरम्यान, येथील प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे, भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेना उमेदवार येथे निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे, येथे महायुतीतील दोन पक्षांतच थेट लढत होत असल्याने मोठी रस्सीखेंच पाहायला मिळत आहे.