सातारा : जिल्हा परिषदेच्या निकालानंतर विविध राजकीय घडामोडींना वेग आला असून आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गटनेत्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले यांची तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी उदय कबुले यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून परळी गटातून निवडून आलेले राजू भोसले हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यापूर्वी श्री. भोसले हे देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले होते. जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची भूमिका ते समर्थपणे मांडू शकतील या भावनेने त्यांच्यावर पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी सोपवलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरवळ गटाचे प्रतिनिधित्व करणारे उदय कबुले यांची गटनेतेपदी निवड केली आहे. उदय कबुले यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून काम केले असून, ते मंत्री मकरंद पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरवळ गटातून नितीन भरगुडे-पाटील यांचा पराभव करुन अपक्ष म्हणून उदय कबुले निवडून आले होते. या पंचवार्षिक निवडणुकीतही शिरवळ गटातून नितीन भरगुडे पाटील यांचा पुन्हा एकदा पराभव केला. जिल्हा परिषदेतील त्यांचा राजकीय अनुभव पाहता पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांच्या गटनेत्यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेतील सदस्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 15 जागा पटकाविले आहेत. हेळवाक गटातील अशोकपाटील यांची शिंदेसेनेच्या गटनेते पदी निवड झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनामध्ये शिवसेना गटाची गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. अशोक पाटील हे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची उठावदार कामगिरी होण्याच्या दृष्टीने शिंदे गटाने अभ्यासू आणि तज्ञ गटनेता दिल्याची चर्चा आहे.