रहिमतपूर : रहिमतपूरची माती ही प्रत्येकाला अभिमान वाटावी अशी माती आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत येथील माहेरवाशीण मातेने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास निर्माण केला. हा इतिहास स्वतंत्र भारत देशाला प्रेरणा देणारा इतिहास आहे. त्या महाराणी जमनाबाई गायकवाड यांच्या कर्तृत्ववाचा सन्मान झाला पाहिजे. हा इतिहास पुढील पिढीला कळला पाहिजे यासाठी रहिमतपूरनगरीत महाराणी जमनाबाई गायकवाड यांचे स्मारक लवकरच उभे राहिल यासाठी मी पाठपुरावा करेन, असे अभिवचन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना दिलेली भेट ‘लाडकी बहिण योजना’ ही आता महिलांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक बनली आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व महिलांचा सन्मान करण्यासाठी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने - कदम, ‘दोन तास समाजासाठी महिला ग्रुप' यांच्यावतीने येथील आयोजित केलेल्या ‘महिला कौतुक सोहळ्यात’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष व आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, सौ. चित्रलेखा माने- कदम, पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिंह जाधवराव, सुरभीताई भोसले, सौ. प्रियंका कदम यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी हजारों महिलांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात सौ. चित्रलेखा माने - कदम यांनी ना. आशिष शेलार यांना राखी बांधली.
ना. आशिष शेलार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांची काळजी घेणारे व त्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणारे नेतृत्व आहे. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना सक्षम केले आहे. महिलांना विविध अधिकार दिले आहेत. सौ. चित्रलेखाताई माने -कदम, ‘दोन तास समाजासाठी’ ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. महिलांचे उत्तम संघटन त्यांनी केले आहे. हा अनोखा उपक्रम केवळ स्तुत्य नसून महिला शक्तीला बळकटी देणारा आहे.
यावेळी आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले
सौ. चित्रलेखा माने - कदम म्हणाल्या, महाराणी जमनाबाई गायकवाड या रहिमतपूरच्या सरदार माने घराण्यातील माहेरवाशीण आहेत. त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. या मातेने बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांना घडविले. अशा कर्तृत्ववान महाराणींचे स्मारक येथील महिलांसाठी प्रेरणास्थान बनावे , यासाठी रहिमतपूरनगरी त्यांचे स्मारक व्हावे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे महिला सक्षम होत आहेत.
कार्यक्रमास सुनेषा शहा, दैवशीला मोहिते, अश्विनी हुबळीकर, निशा जाधव, वैष्णवी कदम, वैशाली टंकसाळे, वैशाली मांढरे, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, तेजस्विनी महिला मंडळ पदाधिकारी , सदस्या, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन तास समाजासाठी महिला ग्रुप, नागरिक व रहिमतपूर व परिसरातील महिला उपस्थित होत्या.