सातारा, दि. १७ : जुन्या वादातून नामदेववाडी झोपडपट्टी येथे बुधवारी सायंकाळी दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातही दोन्ही गट समोरासमोर आल्याने पुन्हा शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणातून दोन गट समोरासमोर आले. सुरुवातीला वादावादी झाली आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. घटनेत काही जण जखमी झाले. या जखमींना तातडीने उपचारासाठी सातारा सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. यावेळी शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सिव्हील रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तणाव वाढू नये, यासाठी रुग्णालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्र्यत सुरु होती.