...अन्यथा गाई, म्हशींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

रयत क्रांती संघटनेच्या प्रकाश साबळे यांचा इशारा

by Team Satara Today | published on : 06 January 2025


सातारा : जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध दर अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाई मशीन सह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबतचे निवेदन प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष देवदास जाधव यांची उपस्थिती होती.

याबाबत साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दूध दर अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र विधानसभा निवडणुकीपासून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल सहा कोटी रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला असून शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत.

त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या दूध दराचे अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे. येत्या आठ दिवसात हे दूध दराचे सहा कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावेत. अन्यथा आठ दिवसानंतर लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आपल्या गाई, म्हशी घेऊन बेमुदत आंदोलन करतील. यामधून होणाऱ्या नुकसानीस सरकार जबाबदार राहील, असेही साबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपा सभासद नोंदणीत जिल्हा नंबर वन करू : मंत्री शिवेंद्रराजे भोसले
पुढील बातमी
शुक्रवार पेठेतून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या