भारत-रशियात प्रवासी विमान उत्पादन करार; आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट

by Team Satara Today | published on : 29 October 2025


मॉस्को : रशियाकडून तेलाची खरेदी थांबविण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच भारताने रशियासोबत विमाननिर्मिती क्षेत्रात ऐतिहासिक करार केला आहे. ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) आणि रशियन कंपनी ‘युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन’ने (यूएसी) मॉस्को येथे ‘सुखोई सुपरजेट एसजे -१००’ या नागरी विमानाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करारावर (एसओयू) स्वाक्षरी केली.

हा करार ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमांसाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे. ‘एचएएल’ला आता भारतात ‘एसजे-१००’ विमान निर्मितीचा विशेष अधिकार मिळाला असून, यामुळे देशात नागरी विमान क्षेत्रात मोठी झेप अपेक्षित आहे. ‘एसजे-१००’ हे ट्विन-इंजिन, नॅरो-बॉडी प्रवासी विमान आहे, ज्यात सुमारे १०० प्रवाशांची क्षमता असून, ते सुमारे ३००० किमीपर्यंत उड्डाण करू शकते. हे विमान विशेषतः देशांतर्गत आणि प्रादेशिक हवाई प्रवासासाठी डिझाइन करण्यात आले आहे. सध्या जगभरात २०० हून अधिक सुपरजेट्स कार्यरत असून, १६ पेक्षा अधिक एअरलाइन्स त्यांचा वापर करत आहेत.

या प्रकल्पामुळे देशात मोठ्या प्रमाणावर थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. विमान निर्मितीशी संबंधित स्पेअर पार्ट्स, देखभाल, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळीमध्ये हजारो संधी निर्माण होतील. ‘एचएएल’साठी हा एक तांत्रिक टप्पा ठरेल, जो भारताला नागरी विमाननिर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळवून देईल.

'उडान'साठी ठरणार गेमचेंजर

विमान तज्ज्ञांच्या मते, भारतात ‘एसजे-१००’चे उत्पादन हे सरकारच्या ‘उडान’ योजनेसाठी गेमचेंजर ठरू शकते. देशातील लहान शहरांना आणि पर्यटन केंद्रांना हवाई सेवेशी जोडण्यासाठी हे विमान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आगामी दशकात भारताला या श्रेणीतील २०० पेक्षा जास्त जेट्सची गरज भासेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांसाठीही ३५० अतिरिक्त विमानांची आवश्यकता असेल.

भारत-रशिया नवा अध्याय

संरक्षण क्षेत्रात आधीच मजबूत भागीदारी असलेल्या भारत आणि रशियामधील हा करार आता नागरी विमान क्षेत्रालाही नवी दिशा देईल. ‘एचएएल’ आणि ‘यूएसी’ यांच्यातील हे सहकार्य भारतात प्रवासी विमान निर्मितीचा पहिला प्रयत्न ठरणार आहे. याआधी ‘एचएएल’ने १९६१मध्ये ‘एव्हीआरओ एचएस-७४८’चे उत्पादन केले होते, जे १९८८ मध्ये थांबवण्यात आले. आता ‘एसजे-१००’ निर्मितीमुळे भारतीय विमाननिर्मिती उद्योगाच्या इतिहासात नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दाऊदच्या ड्रग्स साम्राज्यावर मोठा धक्का; दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर एनसीबीची मोठी कारवाई
पुढील बातमी
अन्नदान हे तर ना. मकरंद पाटील यांच्या पदाला साजेसे काम - सागर भोगावकर; वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने अन्नदान

संबंधित बातम्या