९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी संपत जाधव

by Team Satara Today | published on : 01 July 2025


सातारा : ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात होणार आहे. मसाप, शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्यावतीने संमेलनाच्या नियोजनाची तयारी स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. संमेलनाच्या नियोजनाबाबत विविध बैठका होत आहेत. संमेलनाच्या नियोजनासाठी सक्रीय सहभाग घेऊन योगदान दिल्याबद्दल या संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी उद्योजक संपत राजाराम जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

संपत जाधव हे उद्योजक असून यापूर्वीही त्यांनी मसाप शाहूपुरी शाखेच्या विविध उपक्रमांना सहकार्य केले आहे. 32 वर्षानंतर साता-यात होणा-या संमेलनासाठीही त्यांनी सक्रीय सहकार्य केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या हस्ते उद्योजक संपत जाधव यांना नियुक्तीपत्र प्रदान देण्यात आले. यावेळी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नंदकुमार सावंत म्हणाले, 99 व्या संमेलनाची तयारी जोरदार सुरु असून सर्व घटकांचा त्याला पाठिंबा मिळत आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, मान्यवर सक्रीय पाठिंबा देत आहेत. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन उत्तम व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.  उद्योजक संपत जाधव यांचे संमेलनासाठी मोठे योगदान दिले असून यापुढेही ते देणार आहेत. त्याची दखल घेऊन त्यांना स्वागत समितीचे पहिले सदस्यपद देण्यात आले.

यावेळी बोलताना उद्योजक संपत जाधव यांनी स्वागत समिती सदस्यपदी नियुक्ती केल्याबद्दल आयोजक संस्थांचे आभार मानले आणि यापुढे लागेल ते सहकार्य आणि पडेल ते काम करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी मसाप शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष अँड. चंद्रकांत बेबले,  कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, वजीर नदाफ उपस्थित होते. या निवडीमुळे उद्योजक संपत जाधव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हिमाचलमध्ये ५ ठिकाणी ढगफुटी
पुढील बातमी
‘मालिक’ चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर प्रदर्शित

संबंधित बातम्या