मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन केलंय. आजच्या या ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. सोबतच मुलींचे स्वतंत्र आयटीआय देखील असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परकीयांच्या आक्रमणामुळे जी श्रद्धास्थाने नष्ट करण्यात आली होती. ती श्रद्धास्थानांच पुनरूत्जीवन करण्याचं काम अहिल्यामातांनी केलं. म्हणून चौंडी येथे राज्य सरकारच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच जतन आणि संवर्धन करण्यासाठी ६८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यातून विविध प्रकारची कामे होतील.