शाहूनगरातील बंगल्यात घुसला बिबट्या

by Team Satara Today | published on : 01 July 2025


सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शाहूनगरमधील सुमित्राराजे हाऊसिंग सोसायटीत रविवारी रात्री एका बंगल्याच्या आवारात बिबट्याने घुसून कुत्र्यावर हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला असून, आता तो थेट मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष चालवले असून, या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी संतप्त मागणी जोर धरत आहे.

शहरातील चार भिंतीकडून पेरेंट स्कूलकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या या सोसायटीतील महेश कानेटकर यांच्या ‘सक्षम’ बंगल्यात हा प्रकार घडला. सततच्या पावसामुळे परिसरातील काही भटकी कुत्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात आश्रयाला होती. वरच्या मजल्यावर महेश कानेटकर यांचे वास्तव्य आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजता अजिंक्यतारा किल्ल्याच्या बाजूने आलेला एक बिबट्या कंपाऊंडवरून उडी मारुन कानेटकरांच्या बंगल्याच्या आवारात घुसला. त्याने सर्व आवारामध्ये फिरून शिकारीचा शोध घेतला. जिन्याच्या खालच्या बाजूला वेगळे गेट असल्याने बिबट्याला जिन्यात जाता येत नव्हते. त्यामुळे तो बाजूच्या कंपाऊंडवर गेला आणि तिथून जिन्यात उडी मारली. याच जिन्याच्या दारातच काही भटकी कुत्री बसलेली होती. त्यातील एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ओढून नेले. हा सर्व थरार कानेटकर यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे कैद झाला आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर घनदाट जंगल असले तरी, अन्नाच्या शोधात बिबट्यासारखे हिंस्र प्राणी आता थेट शहराच्या वस्तीत घुसत आहेत. नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असतानाही वनविभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात वन विभागाने पिंजरा लावला होता, मात्र बिबट्याने त्याला हुल दिल्यानंतर तो पिंजरा काढून नेण्यात आला. तेव्हापासून वनविभागाने या समस्येकडे पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याच परिसरात गुरुकुल आणि पेरेंट स्कूलसारख्या मोठ्या शाळा आहेत, जिथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. बिबट्याच्या या वाढत्या वावरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. वनविभाग केवळ मोरांना पकडतो, पण बिबट्यासारख्या घातक प्राण्याला मोकाट सोडतो, असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे. एवढी मोठी घटना घडूनही वनविभागाने कोणतीही हालचाल केली नसल्याने नागरिकांमधील रोष वाढत आहे. आतातरी वनविभाग या समस्येचे गांभीर्य ओळखून कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला मोठी लोकवस्ती आहे. तिथूनच एक ओढा वाहतो. या ओढ्यामध्ये काही दिवसांपूर्वी मादी बिबट्या आणि त्याच्या पिल्लांचे परिसरातील लोकांना दर्शन घडले होते. या परिसरामध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, वनविभागाने तत्काळ कारवाई करावी. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
पुढील बातमी
'आयटी'वाल्या पोरांची एआय दिंडी

संबंधित बातम्या