कराड तालुक्यातील सह्याद्री पतसंस्थेच्या मनमानीविरोधात शेतकरी संघटनेची निदर्शने; जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

by Team Satara Today | published on : 10 October 2025


सातारा : कराड तालुक्यातील सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी संघटना व किसान मंच, महाराष्ट्रतर्फे आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी केले.

सह्याद्री पतसंस्थेच्या कर्जदार उषा आनंदराव यादव यांनी संस्थेकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी त्यापैकी तब्बल ७८ हजार रुपयांची परतफेड केली असतानाही, संस्थेने कलम १०१ अंतर्गत कारवाई करून तारणातील ३ गुंठे मालमत्ता विक्रीस काढली.

याविरोधात उषा यादव यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आणि न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, तरीदेखील पतसंस्थेने न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले असून, कर्जाचे स्टेटमेंट व मागणीपत्रे देण्यास टाळाटाळ सुरूच ठेवली आहे. तसेच ३ गुंठे जागा लाटल्याची यादव यांची गंभीर तक्रार आहे. याशिवाय संस्थेवर नेमण्यात आलेल्या अवसायकालाही आवश्यक कागदपत्रे देण्यास संस्थेचे पदाधिकारी टाळाटाळ करत आहेत, असा आरोप निदर्शकांनी केला.

उषा यादव यांनी संस्थेने आमची ताब्यात घेतलेली मालमत्ता तत्काळ परत द्यावी, अशी मागणी केली. या मागणीसाठी त्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.या निदर्शनात मोठ्या संख्येने शेतकरी व पतसंस्थेचे ग्राहक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान ''न्याय द्या, अन्याय थांबवा!'' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विविध प्रकारच्या 15 आहुतींचे दान होमकुंडात देऊन दुर्गामाता सहस्त्रचंडी याग
पुढील बातमी
सासपडे येथील शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू; गावात तणावाचे वातावरण; जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

संबंधित बातम्या