वडूज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ.स्वप्नाली गणेश गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षा सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यानच्या काळात उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. नगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला होता. नगराध्यक्ष पदासाठी सौ.स्वप्नाली गोडसे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे सौ.गोडसे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया झाली.
यावेळी मुख्याधिकारी सतीश चव्हाण तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. सौ.गोडसे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा ग्रामविकास व पंचायत राज्य मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल माळी धनंजय चव्हाण आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडीनंतर सौ.गोडसे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला
सौ. सोनिया गोरे म्हणाल्या, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव-माण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. वडूज शहराच्या विकासासाठी मंत्री गोरे यांनी झुकते माप दिले आहे. नगरपंचायतीच्या नूतन पदाधिकार्यांनी शहराच्या विकासाचा आलेख कायम ठेवण्यासाठी योगदान द्यावे.
सौ. गोडसे म्हणाल्या, मंत्री गोरे यांनी मला नगराध्यक्ष म्हणून नगरपंचायतीमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. आगामी काळात शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटीबध्द राहू.असे आश्वासन त्यांनी दिले.