कराड तालुक्यातील उंडाळे येथे मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 07 March 2026


कराड :  कराड तालुक्यातील उंडाळे गावात 'ठाकराची मळी' नावाच्या शिवारात शनिवारी दुपारी पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरित मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला.   किरण बाजीराव चव्हाण (वय ३०) व अमर रंगराव वडार (वय ३०, दोघेही रा. मनव) अशी  मृत झालेल्याची नावे आहेत. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उंडाळे येथील ठाकराची मळी नावाच्या शिवारात श्रीरंग हरी पाटील यांच्या शेताजवळील विहिरीत पाणी सोडण्यासाठी शनिवारी दुपारी पाईपलाईनचे काम सुरू होते. त्यासाठी जेसीबीच्या साह्याने १० ते १२ फूट खोल चर खोदण्यात आली होती. किरण चव्हाण व अमर वडार हे दोघेजण या खोदलेल्या चरित सिमेंटच्या पाईप जोडण्याचे काम करीत होते.

चर खोदून झाल्यानंतर जेसीबी ऑपरेटरसह इतर काहीजण जेवायला झाडाखाली बसले. त्यावेळी किरण व अमर या दोघांनाही जेवण झाल्यानंतर पाईप जोडण्याचे काम करू, असे इतरांनी सांगितले. मात्र, इतर ठिकाणी दुसरे काम असल्यामुळे ते दोघेजण पाईप जोडण्यासाठी चरीमध्ये उतरले.

काही वेळानंतर किरण व अमर या दोघांचा कसलाच आवाज येत नसल्याने सर्वजण चरिकडे गेले. त्यावेळी चरीमध्ये मातीचा ढिगारा कोसळल्याचे त्यांना दिसले. किरण आणि अमर त्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वाढल्यामुळे सर्वांनी माती बाजूला केली. त्यावेळी दोघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघांनाही उंडाळेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात गर्दी जमवून मारामारी केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या