साताऱ्याचा उपनगराध्यक्ष कोण होणार? ; नागरिकांची उत्सुकता शिगेला

नगरपालिका निवडणुकांचा निकाल केवळ तीन दिवसांवर ; ६ ते ७ बंडखोरांना लागणार विजयाची लॉटरी?

by Team Satara Today | published on : 17 December 2025


सातारा :  तब्बल सहा वर्षानंतर झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला असून या निकालाबाबत नागरिकांची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहचली आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. सुवर्ण पाटील यांच्यात झाली असली तरी प्रत्यक्षात साताऱ्याचा उपनगराध्यक्ष कोण होणार? याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, नगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी बंडखोरी केली असून ६ ते ७ बंडखोरांना विजयाची लॉटरी लागणार असल्याचे अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहेत.

गत नोव्हेंबर महिन्यात सातारासह जिल्ह्यातील अन्य सात नगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. सुमारे चार वर्षांपूर्वी सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे यावेळी प्रथमच तब्बल ५० जाग्यांवर निवडणूक झाली. यावर्षी पारंपारिक सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांच्यात लढत न होता या दोन्हीही आघाड्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. सातारा शहराचे नगराध्यक्ष पद खुले झाल्यामुळे या पदाच्या उमेदवारीसाठी सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष तथा खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून काका धुमाळ, संग्राम बर्गे, किशोर शिंदे यांचे तर नगर विकास आघाडीचे अध्यक्ष, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण यांची नावे पुढे करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उरमोडी येथील एका फार्म हाऊसवर दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी आम्हाला नगराध्यक्षपद मिळावे, अशी मागणी केली होती. दुसरीकडे उदयनराजे भोसले हे सुद्धा हे पद आपल्याच गटाकडे रहावे, यासाठी कमालीचे आग्रही राहिले होते. अखेर नगराध्यक्ष पदाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील अमोल मोहिते यांच्या नावाला पसंती दिली.

नोव्हेंबर महिन्यामध्ये सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली असली तरी गेल्या वर्षभरापासून शरदचंद्र पवार गटाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी साखर पेरणी करून ठेवली होती. महाविकास आघाडीतील आपल्या मित्र पक्षांच्या प्रमुखांसोबत त्यांनी वारंवार बैठका घेऊन वातावरण निर्मिती केली होती. भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोहिते यांचे नाव जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ. सुवर्ण पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचे अस्त्र उगारले होते. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना फार यश न आल्यामुळे यावर्षी प्रथमच सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी १६९ उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचा ठामपणे निर्णय घेतला.

उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्हीही नेते प्रचारात सक्रिय राहिले. दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. शशिकांत शिंदे यांनी मित्रपक्ष काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि अन्य मित्र पक्षांना बरोबर घेत सातारा येथील गांधी मैदानावरून प्रचाराचे रणशिंग फुकले. या निवडणुकीत भाजपाने सातारा शहराचा झालेला विकास तर महाविकास आघाडीने सातारा शहराचा झालेला भकास आणि भविष्यात होणारा विकास कळीच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले गेले.

दरम्यान, दि. २ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील सातारासह अन्य ७ नगरपालिकांसाठी मतदान झाले. त्यामध्ये सातारा नगरपालिकेसाठी ६० टक्के मतदान होऊन १७८ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले होते. प्रत्यक्षात मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार होती मात्र मतदाना दिवशी निवडणूक आयोगाने दि. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. आता मतमोजणीसाठी केवळ तीन दिवस बाकी असून साताऱ्याचे नगराध्यक्ष कोण होणार? अमोल मोहिते का सौ. सुवर्ण पाटील? खा. उदयनराजे भोसले उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार? याबाबत सातारकरांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असल्यामुळे ६ ते ७ बंडखोरांना विजयाची लॉटरी लागण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांमधून होत असल्यामुळे ते भाग्यवान बंडखोर कोण? याकडेही सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रतापगड कारखान्याचा प्रतीटन एकरकमी ३३५० रुपये दर - चेअरमन यशवंत साळुंखे, संचालक मंडळाच्या सभेत निर्णय
पुढील बातमी
कधी येणार...,, कधी येणार..., १५०० रुपये खात्यात कधी येणार? सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची अवस्था ; २३ किंवा २४ डिसेंबरला खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता

संबंधित बातम्या