सातारा : फलटण तालुक्यातील राजाळे येथील एका सराईत गुन्हे करणाऱ्या टोळीला एसपी तुषार दोशी यांनी दणका दिला आहे. सातत्याने गुन्हे करणाऱ्या ६ जणांच्या या टोळीला सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्यात आले आहे. यातील टोळीच्या सदस्यांवर खुनाचा प्रयत्न करणे, गर्दी मारामारी व गंभीर दुखापत करणे, यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आली.
टोळी प्रमुख स्वप्निल रमेश निकम (वय २८) रोहन रविंद्र उर्फ बाळासाहेब निंबाळकर (वय २४), ज्ञानेश्वर उर्फ माऊली हिराचंद निंबाळकर (वय ३५), सागर संभाजी निंबाळकर (वय ३५), सुरज उर्फ सोनु धनाजी भोईटे (वय ३०) विनोद भिकोजी उर्फ भिमराव भोईटे (वय ३९, सर्व रा. राजाळे, ता. फलटण)
या टोळीतील सदस्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यांच्यावर कायद्यचा कोणताच धाक न राहिल्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती.
त्यानुसार तत्कालीन पोनि सुनील महाडीक यांनी या टोळीविरूध्द तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. या प्रस्तावावर सुनावणी होवून एसपी तुषार दोशी यांनी या टोळीला तडीपार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या टोळीतील ६ जणांना सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांविरूध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत. यासाठी एलसीबीचे पोनि अरुण देवकर, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस, वैभव सूर्यवंशी यांनी पुरावे सादर केले.