मलवडी : जगातील सर्वांत बुटकी म्हैस म्हणून मलवडी (ता. माण) येथील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या ‘राधा’ नावाच्या पाळीव म्हशीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याबद्दल सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने शेतकरी व पशुपालक श्री.त्रिंबक बोराटे यांच्या मलवडी येथील निवासस्थानी भेट देऊन या ठेंगण्या- ‘राधा’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याबद्दल सन्मान केला.
याप्रसंगी ना. जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशीलदादा कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनतात्या काळेयुवानेते सिद्धार्थ गुंडगे, मलवडीचे सरपंच दादासाहेब जगदाळे, परकंदीचे सरपंच बाळासाहेब कदम, उद्योजक दुर्योधन सस्ते, माजी पंचायत समिती सदस्य कुमार मगर, दशरथशेठ बोराटे, दादा सुरेश जगदाळे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकरी हे निसर्गाच्या आव्हानांवर मात करून, कठोर परिश्रम आणि चिकाटीने पशुधनाच्या मदतीने शेती करतात,ज्यामुळे सर्वांसाठी अन्न उपलब्ध होते, म्हणून ते नेहमीच कौतुकास्पद आहेत. विविध कारणांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, तरीही ते आपलं काम चिकाटीने करत राहतात. शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांनी या वेगळ्या अशा राधा या म्हशीचा योग्य प्रकारे सांभाळ करून तिला संपूर्ण जगामध्ये एक वेगळं स्थान मिळवून दिल आहे ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याबद्दल शेतकरी त्रिंबक बोराटे व त्यांचे चिरंजीव अनिकेत बोराटे यांचा देखील या सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला.
श्री.त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच मुऱ्हा म्हशीच्या पोटी जून २०२२ मध्ये ‘राधा’चा जन्म झाला. ‘राधा’ दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीत बदल होत नसल्याचे बोराटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने ‘राधा’ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला.सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. डिसेंबर २०२४ मध्ये सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा ‘राधा’ने सहभाग घेतला. अन् ‘राधा’चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी, कर्नाटकातील निपाणी यांसह एकूण १३ कृषी प्रदर्शनांत खास आकर्षण म्हणून ‘राधा’ला निमंत्रित करण्यात आले.
२४ जानेवारी २०२५ रोजी राधा" ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत बोराटे यांनी राधाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न सुरू केले २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.