खंडाळा : खंडाळा पोलिसांनी ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून यामध्ये चोरी केलेले 14 लाख 10 हजारांचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दत्तात्रय सदाशिव जाधव (वय 34, रा.पेनूर, ता.मोहोळ, जि.सोलापूर), विनायक रघुनाथ बोबाळे (रा. आळंदी म्हतोबाची, ता. हवेली जि. पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दि. 2 रोजी पारगाव खंडाळा येथील संतोष यादव यांचा ट्रॅक्टर चोरी झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून ट्रॅक्टर चोरीचा शोध सुरू झाला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पारगावमधून चोरी झालेला ट्रॅक्टर व एका संशयितास इंदापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच ही ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी उघडकीस आली.
या टोळीने भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतून आणखी एक ट्रॅक्टर चोरून तो कर्नाटकमध्ये ठेवल्याची माहिती मिळताच तपासी पथकाने हिरोळी भागामध्ये जाऊन चोरीचा ट्रॅक्टर हस्तगत केला. खंडाळा पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपी व तब्बल 14 लाख 10 हजार रुपयांचे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत.
या कारवाईमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के, पोलीस अंमलदार चंद्रकांत धापते, अमित चव्हाण, नितीन महांगरे, गोविंद आंदळे, महिला पोलीस चालक अक्षता हिप्परकर यांनी सहभाग घेतला.