हाच खरा मर्दांचा खेळ, निवडणुका तर तृतीयपंथीही लढवतात

गोवा येथील आयसीएन स्पर्धेमध्ये डॉ. संदीप काटे यांना दुहेरी सुवर्णपदक

by Team Satara Today | published on : 01 December 2025


सातारा :  काही दिवसांपूर्वी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार अशी घोषणा करून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या, सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे यांनी गोवा येथील आयसीएन स्पर्धेमध्ये Men’s Physique आणि Men’s Fitness या दोन्ही प्रकारांत दोन सुवर्णपदके पटकावत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा झेंडा राज्याबाहेर फडकवला आहे. त्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशानंतर त्यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून हाच खरा मर्दांचा खेळ, निवडणुका तर तृतीयपंथीही लढवतात, अशा उस्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर डॉ. संदीप काटे यांनी सातारा टुडे च्या माध्यमातून सातारच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार अशी घोषणा करून जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या घोषणेचे स्वागत करत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यांच्या या राजकीय भूमिकेचे सर्व स्तरातून अभिनंदन ही झाले होते. दरम्यान कौटुंबिक जबाबदाऱ्या, वैयक्तिक बंदिलकी आणि गोवा येथे होणाऱ्या आयसीएन स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करता यावी यासाठी सातारच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.अलीकडेच गोवा येथे झालेल्या आयसीएन स्पर्धेमध्ये डॉ. संदीप काटे यांनी दोन सुवर्णपदके जिंकून जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा झेंडा परराज्यात फडकवला आहे.

या अभूतपूर्व यशानंतर त्यांचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आ. शशिकांत शिंदे यांची डॉ. संदीप काटे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. दरम्यान, याप्रसंगी डॉ. काटे यांनी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपला पाठिंबा व्यक्त करत तिसऱ्या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवार सौ. सुवर्णा पाटील यांना त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.

सातारकारांनी तुतारी वाजवावी : आ. शशिकांत शिंदे 

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. शशिकांत शिंदे आणि डॉ. संदीप काटे यांच्या भेटीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले होते. या भेटीनंतर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असून जनतेने नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवार सौ. सुवर्णाताई पाटील यांच्यासह तिसऱ्या आघाडीच्या अन्य इच्छुक उमेदवारांना निवडून देत सातारकरांनी तुतारी वाजवावी, असे आवाहन केले.

डॉ. संदीप काटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

डॉ. संदीप काटे यांचे महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक खेळाडू मित्र आहेत. सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या माध्यमातून त्यांनी संपर्क वृद्धिंगत केला असून डॉ. संदीप काटे यांनी दोन सुवर्णपदकाचा डबल धमाका केल्याची माहिती सोशल मीडियावर मिळताच हाच खरा मर्दांचा खेळ, निवडणुका तर तृतीयपंथीही लढवतात, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तांत्रिक कारणामुळे फलटण, महाबळेश्वर पालिका निवडणूक लांबणीवर; 20 डिसेंबर रोजी होणार मतदान; राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
पुढील बातमी
जिल्ह्यात हुडहुडी.....; सातारा गारठला, रविवारी रात्रीपासून थंडीचा जोर

संबंधित बातम्या