अक्षय कुमार आणि वीर पहारियाच्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर (२४ जानेवारी) रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. देशभक्तीपर आधारित असलेला हा चित्रपट रिलीज होऊन जेमतेम ४ दिवसच झाले आहेत. या चार दिवसांत चित्रपटाला प्रेक्षकांकडून दिलासादायक प्रतिसाद मिळालेला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या विकेंडला भरघोस कमाई केल्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजेच रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे. जाणून घेऊयात चित्रपटाची चार दिवसांची कमाई किती आहे ?
अक्षय कुमार आणि वीर पहारियाच्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटाला पहिल्या सोमवारच्या कमाईमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. चित्रपटाने विकेंडला बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कमाई केली असली तरी सोमवारी त्याची कमाई कमालीची घसरली आहे. सुरुवातीच्या दिवसाच्या तुलनेत चौथ्या दिवशी कमाईत सुमारे 49% ची मोठी घट झाली आहे, जी या ॲक्शन-ड्रामासाठी चांगली बातमी नाही. ‘स्काय फोर्स’चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली होती. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १५.३० कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी २६.३० कोटी रुपयांचे कलेक्शन, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी २६ जानेवारीला सुट्टीच्या दिवशी ३१.६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
पण चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाच्या कमाईमध्ये लाक्षणिक घसरण झाली आहे. प्रारंभिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या सोमवारी ६.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. ४ दिवसांत चित्रपटाने भारतात ९० कोटींच्या पार कमाई केलेली असून जगभरात लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. १६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या वीर पहारिया आणि अक्षय कुमारच्या चित्रपटाने बजेटच्या तुलनेत निम्म्याहून जास्त कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट येत्या काही दिवसांत निर्मितीखर्च वसूल करेल, अशी शक्यता आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित हा चित्रपट आहे. खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या कथानकाचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे.
‘स्काय फोर्स’ चित्रपटात प्रेक्षकांना एक रोमांचकारी कथा बघायला मिळणार आहे. ‘स्काय फोर्स’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि वीर पहारिया सोबतच सारा अली खान, निम्रत कौर आणि शरद केळकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘स्त्री’ आणि ‘मुंज्या’ या हॉरर युनिव्हर्स चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मसच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूरने केलेलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि अमर कौशिकने केली आहे. दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मस या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.