सातारा : कोडोली येथील शेतकरी पृथ्वीराज हनुमंत जाधव यांचे प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरकुलाचे काम ग्रामपंचायतीने रोखले आहे. त्यामुळे मी रस्त्यावर आलो आहे. या संदर्भात मला न्याय न मिळाल्यास 4 एप्रिल पासून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा पृथ्वीराज हनुमंत जाधव रा. कोडोली, चंदन नगर, सातारा यांनी दिला आहे.
त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप पत्रकारांसमोर केला. ते म्हणाले, गावात माझ्या घरकुलाचे काम मंजूर झाले असून त्याचा पहिला हप्ता सात मार्च 2023 रोजी मिळाला. मात्र गावातील काहीजणांनी माझ्या घरकुल कामाबद्दल चुलत भावाला तक्रार करायला लावून ते काम थांबवले. त्यानंतर माझ्या सख्ख्या भावाने या घरकुलाच्या विरोधात तक्रार दिली. मी वारंवार ग्रामपंचायतीला भेटून याबाबत कल्पना दिली, पोस्टाने पत्र व्यवहार केला मात्र, मला न्याय मिळाला नाही. त्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्याचबरोबर माझ्या नातेवाईकांनी माझी पत्नी अर्चना जाधव हिला बेदम मारहाण केली. तसेच 11 एप्रिल रोजी माझ्या पत्नीला डिस्चार्ज मिळत असताना दुसरीकडे माझ्या घरात चोरी सुद्धा झाली. त्याची फिर्याद सुद्धा पोलीस स्टेशनला घेण्यात आली नाही.
दिनांक 27 जून 2024 रोजी माझ्या लहान भावाचा मृतदेह विहिरीमध्ये सापडला. त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही. यासंदर्भात मी 6 सप्टेंबर 2024 व 2 डिसेंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक सातारा यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. माझ्या भावाला पोहायला येत होते आणि त्याचा विहिरीत मृतदेह आढळून येतो म्हणजे हा नक्कीच घातपात आहे. मात्र पोलीस ही तक्रार दाखल करून घेत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. माझ्या कुटुंबाला जाणीवपूर्वक गावातील विघ्नसंतोषी लोकांकडून त्रास दिला जात आहे. मला या प्रकारात न्याय मिळावा अन्यथा मी 4 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे, असा इशारा पृथ्वीराज जाधव यांनी दिला आहे.