अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार नाम फाउंडेशनला जाहीर; एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप

by Team Satara Today | published on : 08 November 2025


सातारा :  युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक वा. ग. चिरमुले यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार 2024 या वर्षासाठी नाम फाउंडेशनला जाहीर झाला आहे.

एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक जाणिवेतून नाम फाउंडेशन ही संस्था सप्टेंबर 2015 मध्ये सुरू केली. राज्याच्या दुष्काळी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना ही संस्था मदत करते. केवळ आर्थिक साहाय्य न करता, या कुटुंबीयांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देते. शेतकर्‍यांच्या समस्यांचे निर्मूलन करून, त्यांना व त्यांच्या कुटुंबांना सशक्त बनवण्यासाठीही ही संस्था कार्य करते. या संस्थेने गेल्या दहा वर्षांत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 2024 या वर्षाचा ‘चिरमुले पुरस्कार’ या संस्थेस देण्यात येणार आहे.

या आधी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, उद्योगपती रतन टाटा, राहुल बजाज, डॉ. सी. रंगराजन, गीतकार, चित्रपट लेखक व दिग्दर्शक गुलजार, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. राजेंद्रसिंह, डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पुरस्कार वितरण कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त दिलीप पाठक, डॉ. अनिल पाटील, डॉ.अच्युत गोडबोले, समीर जोशी यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आजच्या तरुणाईच्या हातात ग्रंथ देणे हे पवित्र काम; व. बा. बोधे; रौप्य महोत्सवी ग्रंथ महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन
पुढील बातमी
पुळकोटी येथील वृध्देच्या खुनाचे गूढ उलगडले; संशयित तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

संबंधित बातम्या