कचरा डेपो प्रश्नी सोनगाव ग्रामस्थांचे पुन्हा पालिकेला निवेदन; आगीमुळे नागरिक त्रस्त; तात्काळ उपाययोजनांची मागणी

by Team Satara Today | published on : 24 March 2026


सातारा : शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून सोनगाव येथील कचरा डेपोमध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. मागील पंधरा दिवसांपासून डेपोमध्ये आग लागलेली असून त्यातून निर्माण होणारा धूर व दुर्गंधी यामुळे जकातवाडी, डबेवाडी, शहापूर, साठेवाडी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी कुरणेश्वर मंदिर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत कचरा डेपोकडे जाणाऱ्या घंटागाड्या अडविल्या. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष  दत्तात्रय बनकर,आरोग्य सभापती  धनंजय जांभळे व नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला व आग विझविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यामध्ये सोनगाव कचरा डेपोमधील आग आठ दिवसांच्या आत पूर्णपणे विझविणे, अन्यथा डेपोमध्ये कोणतीही घंटागाडी प्रवेश करू न देण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहरात घरपातळीवर ओला व सुका कचरा वेगळा करूनच संकलन करण्याची सक्ती करावी व कचरा प्रकल्पावर येणाऱ्या कचऱ्याचे त्याच दिवशी वर्गीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय बोगदा ते सोनगाव व बोगदा ते डबेवाडी रस्त्यालगत साचलेला कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी व कर्मचारी नेमण्याची मागणीही करण्यात आली आहे. धुरामुळे जकातवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने ग्रामपंचायत कार्यालयात दररोज सकाळी १० ते १२ या वेळेत डॉक्टर व औषधांची व्यवस्था करावी, अशीही मागणी पुढे आली.

तसेच अजिंक्यतारा किल्ला व यवतेश्वर परिसरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी रस्त्यालगत मोठ्या गटारांची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या सर्व मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेसमोर कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
सातारा पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करण्यासाठी शिवसेनेचा साताऱ्यात मूकमोर्चा; जिल्हा प्रशासनाला निवेदन

संबंधित बातम्या