बोटींमधून रात्रीच्यावेळी वाळूचा बेकायदा उपसा

आता‘ड्रोन’द्वारे नदी नाल्यांवर ‘वॉच’ ठेवण्यास सुरुवात

by Team Satara Today | published on : 10 December 2024


पुणे : पुणे जिल्ह्यात नदी नाल्यांमधून वाळूची उपसा केली जात आहे. बोटींमधून रात्रीच्यावेळी वाळूचा बेकायदा उपसा तसेच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ड्रोन’द्वारे आता नदी नाल्यांवर ‘वॉच’ ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाळू माफियांच्या वाळू चोरीला चाप बसणार आहे. जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड तसेच आंबेगाव, जुन्नर भागात या ड्रोनचा वापर केला जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बेकायदा वाळू उपसा राजरोजपणे सुरू आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांना वाळू माफक दरात मिळावी यासाठी धोरण आखले आहे. त्यानुसार प्रति ब्रास सहाशे रुपये दराने वाळूची विक्री केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात सुमारे २६ ठिकाणी ठेके देण्यात आले आहेत. त्यानुसार वाळूची विक्री सध्या केली जात आहे. तरीही वाळूचा बेकायदा उपसा सुरू असून, त्याद्वारे वाळूची तस्करी केली जात आहे. त्यासाठी ही चोरी पकडण्यासाठी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ड्रोनचा वापर सुरू केला आहे.

दिवसा किंवा रात्री नदीतून बोटीद्वारे वाळूचा उपसा केला जातो. मात्र, उपसा केलेल्या वाळूचा साठा नदीकाठच्या झाडा झुडपांमध्ये लपविला जातो किंवा शेजारील शेतीमध्ये ठेवला जातो. तसेच ट्रकही तेथेच लपविले जातात. त्या जागेपर्यंत महसूल विभागातील तहसिलदारासंह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नाही. त्यामुळे वाळू चोरी रोखणे शक्य होत नाही. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने दोन ड्रोन घेतले असून, त्याद्वारे आता नदी नाल्यांवर वॉच ठेवला जाणार आहे.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असेलल्या वाळू उपसा होणाऱ्या नदीपात्रावर स्थानिक अधिकाऱ्यासह तलाठ्याच्या मदतीने ड्रोनद्वारे पाहणी केली जाईल. त्याची अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली आहे. याासाठी जिल्हा प्रशासनाने एका कंपनीची नियुक्ती केली आहे.

बऱ्याचवेळा महसूल किंवा पोलीस पथक कारवाईसाठी आल्याची भनक लागल्याने हे माफिया पळून जातात, तसंच नंतर त्यांची ओळख पटवणे सुद्धा अवघड जाते. मात्र आता थेट ड्रोनच्या माध्यमातून वाळू तस्कर कॅमरामध्ये कैद होतील. त्यामुळे पळून गेल्यानंतरही तस्करांची ओळख पटल्याने त्यांच्यावर त्या पुरावांच्या आधारे कारवाई करता येणार आहे.

पुणे जिल्ह्यात नदी, नाले असलेल्या दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव भागात ड्रोनच्या माध्यमातून वाळू चोरट्यांवर नजर ठेवली जाणार आहे. ड्रोनद्वारे नदीतील बेकायदा वाळू उपसावर लक्ष टेऊन कारवाई केली जाणार आहे. दिवसाढवळ्या वाळू उपसा करण्याऐवजी रात्री केली जाते. त्यामुळे ड्रोनद्वारे पाहणी करून वाळूचोरीवर लक्ष ठेवले जाईल.

– सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
झेडपीच्या इमारतीत दिव्यांगासाठी बनवला रॅम्प
पुढील बातमी
‘बेबी जॉन’ चित्रपट २५ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर होणार रिलीज

संबंधित बातम्या