सातारा : सातारा शहराच्या उशाला असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला परिसरात बिबट्यांची दहशत कायम असतानाच गेल्या चार दिवसांपासून शहर परिसराला अपघातांच्या मालिकेने ग्रासले असून चार दिवसांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्यामुळे सातारा शहरासह परिसरामध्ये ठोकशाही सुरू झाली आहे की काय? आता असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कामानिमित्त सकाळी बाहेर पडलेला घरातील सदस्य संध्याकाळी घरी सुरक्षित पोहोचेल का नाही याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे महामार्गांवर लावण्यात येणाऱ्या सावधान ! घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे, या फलकाची आठवण सातारकरांना होऊ लागली आहे.
काही दिवसांपूर्वी अजिंक्यताराच्या कुशीत असणाऱ्या शाहूनगर येथील एका अर्धवट इमारतीमध्ये बिबट्याची दोन छोटी बछडी आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेच्या निमित्ताने अजिंक्यतारा परिसरासह यवतेश्वर येथेही बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढू लागला असल्याचे स्पष्ट होऊ लागल्यामुळे अजिंक्यताराच्या कुशीत असणाऱ्या बोगदा, चार भिंत, शाहूनगर, जगतापवाडी या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी सहानंतर चारभिंत येते फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरीकडे अजिंक्यतारा किल्ला येथे पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या सातारकर यांची संख्याही कमी नाही. सातारा जिल्हा प्रशासनाला बिबट्यासंदर्भात अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात यश आले नसताना गेल्या चार दिवसात सातारा शहरासह परिसरामध्ये अपघातांची मालिका सुरू झाली आहे. दि. २ डिसेंबर रोजी सातारा ते देगाव मार्गावर ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात ओंकार गवळी या वीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून या अपघातातील ट्रकचालक ट्रकसह पसार होण्यात यशस्वी झाला आहे. त्यानंतर दि. ३ डिसेंबर रोजी बॉम्बे रेस्टॉरंट ते देगाव फाटा मार्गावर झालेल्या अपघातातील जखमी अतिक फारुक शेख, सध्या रा. सारखळ फाटा, ता. सातारा यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.
या दोन घटना ताज्या असतानाच गुरुवारी रात्री शिवथर, ता. सातारा या ठिकाणी दुचाकी खड्डयात आदळून दुचाकीवरून खाली पडलेल्या कैलास ज्ञानेश्वर फासे, रा. भिकवडी- विटा, जि. सांगली याच्या डोक्यावरून कंटेनर चे चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सातारा शहरासह परिसरामध्ये गेल्या चार दिवसात झालेल्या अपघातांच्या मालिकेत तीन जणांचा बळी गेल्यामुळे सातारासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सावधान ! घरी तुमची कोणीतरी वाट पाहत आहे, या फलकाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
अपघातांच्या आईचा घो...
सातारा शहराची उपनगरे समजल्या जाणाऱ्या बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, देगाव फाटा या परिसरात वाहतूक नियमानासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांचे दर्शन केव्हातरी होते प्रत्यक्षात मात्र दुर्घटनांपेक्षा त्यांचा जोर वाहनांची कागदपत्रे पडताळणीमध्येच अधिक जात असल्यामुळे बेदरकार वाहने चालवणाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिला नाही. वाहनांची तपासणी झाली पाहिजेच मात्र केवळ वसुलीमध्ये वाहतूक पोलीस गुंग झाल्यास उद्या सातारकरांवर अपघातांच्या आईचा घो... म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
खड्डे पाचवीलाच पुजलेले....
बेंगलोर- पुणे राष्ट्रीय महामार्गासह सातारा उपनगरातील रस्त्यांना खड्डयांचे ग्रहण लागले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली एवढेच कारण रस्त्यांवरील खड्डयांना पुरेसे नसून रस्त्यांच्या कामात केवळ मलाई खाण्यात गुंग झालेले ठेकेदारही या अपघातांना तितकेच कारणीभूत आहेत मात्र दुर्दैवाने अशा कोणत्याही ठेकेदारावर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे सातारा उपनगरातील नागरिकांच्या पाचवीला रस्त्यावरील खड्डे पुजलेलेच आहेत, असेच म्हणावे लागेल.
शिवेंद्रसिंहराजे आता तुम्हीच लक्ष घाला....
अनेक वर्षानंतर सातारा जिल्ह्याच्या वाट्याला सार्वजनिक बांधकाम हे कॅबिनेट मंत्रीपद आले आहे. सातारा -जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिहराचे भोसले यांच्याकडे या खात्याची जबाबदारी असून किमान त्यांनी तरी उपनगरासह सातारा जिल्ह्यातील रस्त्यांची स्वतः लक्ष घालून दखल घ्यावी अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.