महाबळेश्वर : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात जमीन हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीच्या वडिलांच्या नावावरील शेतजमिनीवर डोळा ठेवून बनावट कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटर्नी) तयार करत ती जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी पुणे व सातारा जिल्ह्यातील सहा जणांविरुद्ध फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आराधना संजयकुमार प्रसाद (वय ५४, व्यवसाय- ऑरगॅनिक शेती, रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या वडिलांच्या मालकीची महाबळेश्वर तालुक्यातील पारुट येथील गट क्रमांक ३७/१, क्षेत्रफळ ४ हेक्टर ६२ आर, तसेच देवळी येथील बाबु धोंडू ढेबे यांच्या नावावर असलेली गट क्रमांक ७३/१, क्षेत्रफळ ० हेक्टर ९१ आर, अशी एकूण कोट्यवधी रुपयांची जमीन आरोपींनी संगनमताने हडप करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तपासादरम्यान मुख्य संशयित विष्णु उत्तम सूर्यवंशी (रा. बीडी बाजाराजवळ, शिक्रापूर, पुणे) याने दि. १५ जून १९९८ रोजीचे खोटे व बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या बनावट दस्तऐवजाच्या आधारे त्याने दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी संशयित क्रमांक दोन पोपट बाळासाहेब गुंडगळ (रा. आर्मिश कॉलनी, निंबाळकर नगर, ताथवडे खंडन कार्यालयाजवळ, जांभे, पुणे) याच्याशी खरेदीखत करून (दस्त क्रमांक ३४३७/२०२५) सदर जमीन बेकायदेशीररित्या विक्री केल्याचा आरोप आहे.
हा व्यवहार कायदेशीर असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी इतर संशयितांनीही सक्रिय सहभाग घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संशयित क्रमांक तीन आशुतोष शंकरराव कदम (रा. कात्रज, पुणे) व संशयित क्रमांक चार दीपक कृष्णकांत कदम (रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी साक्षीदार म्हणून, तर संशयित क्रमांक पाच रणजित विश्वासराव काळभोर व संशयित क्रमांक सहा प्रितम संतोष काळभोर (दोघेही रा. पाल, ता. कराड) यांनी ओळखदार म्हणून सह्या केल्याचे समोर आले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित संशयितांविरुद्ध फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच महाबळेश्वर तालुक्यात अशा प्रकारचे इतर बनावट जमीन व्यवहार झाले आहेत का, याचाही सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.