सातारा : पंचायत समिती वाई येथील सेवानिवृत्त कर्मचार्यांना वेळेत सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) व चौथ्या हप्त्याचे अनुदान प्राप्त होत नाही. याला कारणीभूत पंचायत समितीतील कार्यरत असणारे अर्थ विभागाचे वरिष्ठ लेखा सहाय्यक असल्याची तक्रार निवेदनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक तालुकाध्यक्ष सावता जमदाडे व कर्मचार्यांनी केल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, याबाबत चौकशी करुन सकारात्मक मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही सातारा जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी दिली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, सातारा जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती वाई यांच्याकडे सेवानिवृत्ती वेतन व चौथ्या हप्त्याचे अनुदान गटविकास अधिकारी वाई यांच्या खात्यावर जमा झालेले आहे. परंतू संबंधित सेवानिवृत्त कर्मचार्यांपर्यंत ते पोहोचले नाही. अनुदान प्राप्त होवून 20 दिवस उलटले तरी सेवानिवृत्त कर्मचार्यांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. संबंधित वेतनाचे काम पाहणारे वरिष्ठ सहाय्यक हे टोलवाटोलवीची उत्तरे देतात. त्यांची चौकशी करावी, अशीही मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर सावता जमदाडे, भिमा भोसले, डॉ. पी. आर. भोसले, आर. व्ही. राऊत, एस. एल. खाडे, एस. व्ही. भोकरे, अरुण हावरे, दिलीप शिरतोडे, भीमराव सोनवले, एस. एस. लोखंडे, विलास लुंगे, बाजीराव धनावडे, स. ए. कांबळे, सु. श. माळवदे, आनंदा रेणुसे, रमेश शिंदे, अशोक डेरे यांच्या सह्या आहेत.
सर्वसामान्य माणसाची वाई पंचायत समितीमध्ये हेलपाटे मारल्याशिवाय कामे होत नाहीत. याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. आता तर याचा अनुभव सेवानिवृत्त कर्मचारीसुद्धा घेवू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिंघम चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगची आठवण काढण्यात आली. ती म्हणजे, आली रे आली... आता तुझी बारी आली, असे एका जाणकार व्यक्तीने सांगितल्यामुळे त्याबाबतही आत्मचिंतन करणे आता गरजेचे वाटू लागले आहे. योगायोग म्हणजे यावेळी वाई विधानसभा मतदारसंघातील दमदार नेते तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांच्याही कानी ही गोष्ट गेली असल्याचे सेवानिवृत्त कर्मचार्यांनी सांगितले.
वाई पंचायत समितीमध्ये वेळेत पेन्शन मिळत नसल्याची तक्रार
by Team Satara Today | published on : 24 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा