फलटण : इलेक्ट्रिक टॉवरची अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी चार जणांची टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून, १० लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धर्मराज बाळू जाधव (रा. रांजणी, ता. माण), सूरज बिभीषण बेलदार (रा. सरडे, ता. फलटण), सागर संभाजी जाधव व रजत अंकुश मदने (रा. राजाळे, ता. फलटण) अशी त्यांची नावे आहेत.फलटण तालुक्यामधून शिक्रापूर ते कर्नाटक अशी इलेक्ट्रिक टॉवर लाइनचे काम चालू आहे. त्याठिकाणी याअगोदर दोन वेळा तार चोरीच्या घटना घडल्या होत्या.
त्याअनुषंगाने या प्रकरणात सचिन संभाजी जाधव (रा. राजाळे, ता. फलटण) व त्यांचे इतर साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार धर्मराज जाधव, सूरज बेलदार, सागर जाधव व रजत मदने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी फरारी संशयित निनाद तानाजी जाधव (रा. पिंपरद, ता. फलटण), सचिन संभाजी जाधव, ऋषिकेश सोमनाथ मदने (रा. राजाळे, ता. फलटण), दीपक गोविंदा पाटील, अक्षय गोविंदा पाटील (रा. चाकण, पुणे) व इतर अज्ञात संशयितांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली.