पुसेगाव यात्रेमध्ये बैलबाजारात मोठ्या प्रमाणात खिलार बैलांची आवक

बैलांच्या खरेदी-विक्रीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल

by Team Satara Today | published on : 03 January 2025


पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेमध्ये भरलेल्या बैलबाजारात मोठ्या प्रमाणात जातिवंत खिलार बैलांची आवक झाली. त्यामुळे जातिवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेला यंदाचा हा बैल बाजार राज्यातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लोकांसाठी पर्वणी ठरत आहे.

पुसेगाव यात्रेतील यंदाच्या बैल बाजारामध्ये उत्साह पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने यावर्षी बैल बाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळत आहे. बैलांच्या खरेदी-विक्रीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.

दहिवडी रोडवरील यात्रा स्थळाजवळ भरलेल्या या बाजारात मोठ्या प्रमाणात बैलविक्रीसाठी दाखल झाले असून, यात काजळी खिलार, कोसा खिलार, म्हैसूर क्रॉस जातीच्या खोंडांची चांगली आवक झाली आहे. शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या खिल्लार आणि म्हैसूर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून, त्यांच्या किमती २५ हजारांपासून लाखाच्या घरात आहेत, तर काही जातिवंत बैलांची ५ लाखांपासून ११ लाखांपर्यंत विक्रमी दरात विक्री झाली. काजळी खिल्लार गायी आणि पशुधनाच्या खरेदी-विक्रीतूनही मोठी उलाढाल होत आहे.

बाजारात सजवलेल्या मांडवाच्या जातिवंत बैलांच्या दावणी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आकर्षक, देखणे, मोठ्या मापाचे, सुदृढ जातिवंत बैल पाहण्यासाठी शौकीन गर्दी करत आहेत.ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी पुणे जिल्ह्यातील अनेक जण खिलार बैलांची खरेदी करत आहेत. बैल बाजारात आलेल्या जनावरे आणि त्यांच्या मालकांसाठी ट्रस्टने आवश्यक त्या सर्व सोयींसुविधा पुरवल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘चला जाणूया वनाला’ निसर्ग पर्यटन योजना
पुढील बातमी
बीड प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती बाबत आ. सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना निवदेन

संबंधित बातम्या