सातारा : 'मंत्री छगन भुजबळ हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दल चुकीचा प्रचार करत आहेत. खरंतर महामंडळाने कोणालाच कोटींचे कर्ज दिलेले नाही. तर १३ कोटीचा व्याज परतावा दिला आहे. आम्ही सन १९८० पासून लढतोय. आता कोठे सन १७/१८ नंतर मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मात्र मराठा समाजातील उद्योजक उभे रहाताहेत हे पाहून भुजबळांच्या पोटात दुखतंय आणि याची माहिती त्यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असणारच अशी टीकाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली.
शुक्रवारी सकाळी नरेंद्र पाटील यांनी कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी कराड येथील मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारी 'सारथी संस्था' व 'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ' पद्धतशीरपणे, टप्प्याटप्प्याने कमजोर व बंद करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. ९ ऑक्टोंबर पासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज प्रकरणे करणाऱ्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना पात्रता प्रमाणपत्र (एल वाय) देणे बंद केले आहे. हा त्याचाच एक भाग आहे म्हणून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
नरेंद्र पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे दीड लाख मराठा उद्योजक बनवण्यात यश आले आहे. भविष्यात ते ५ लाखापर्यंत बनवण्याचे धोरण आहे. मात्र इच्छुक कर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र देणे महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बंद केल्याने याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोन तीनदा पत्रव्यवहार करून प्रमाणपत्र देणे का बंद आहे हे विचारले असता सॉफ्टवेअर मधील दोष असे एकदा सांगण्यात आले. मात्र पुन्हा केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे? त्यांना नेमक्या कुणी काय सूचना दिल्या आहेत का? याबाबत माहिती घेणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातीलच काही मंत्री वेगवेगळ्या व्यासपीठावर मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, निजामांचे गॅजेट, मराठ्यांचे आंदोलन, मराठा समाजासाठी असणारी सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या विरोधात बोलत आहेत. ही बाब चुकीची आहे.