सातारा : सातारा पालिका निवडणुकीसाठी 213 चिन्हांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी पालिका कार्यालयाच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारालगत दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात आली आहे. ही यादी पाहण्यासाठी अपक्ष उमेदवारांची गर्दी झाली होती. या यादीमुळे अपक्षांना निवडणूक चिन्हे मिळण्यात अडचण येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आशिष बारकुल यांनी सांगितले.
यावेळी सातारा पालिकेची निवडणूक आघाड्यांऐवजी पक्षीय पातळीवर लढवली जाण्याची चिन्हे आहेत. या लढतीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे स्वरूप आले आहे. मात्र, या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. अनेक उमेदवार अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची शक्यता असल्याने, या निवडणुकीसाठी तब्बल 213 चिन्हांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत शिट्टी, बैलगाडी, कपबशी, मोटार वाहन, कंदील यासह अनेक चिन्हांचा समावेश आहे. या चिन्हांमधील कोणते चिन्ह आपल्या सोयीचे असू शकते, यावर उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा खल सुरू आहे. मतदारांच्या लक्षात राहतील अशी चिन्हे निवडण्याचा अपक्षांचा प्रयत्न राहणार आहे. अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे भरपूर पर्याय उपलब्ध असल्याने कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती बारकुल यांनी दिली.