जिल्हा परिषदेसमोर शालेय पोषण आहार कर्मचारी यांचे आंदोलन

by Team Satara Today | published on : 09 July 2025


सातारा : शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांवर आतापर्यंत अन्यायच होत आला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करावी तसेच शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा मिळावा, आदी मागण्यांसाठी आयटक संलग्न शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही झाली. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

या आंदोलनात संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष ऍड. नदीम पठाण, पश्चिम महाराष्ट्र सह सचिव विठ्ठल सुळे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पवार, जिल्हाध्यक्ष कविता उमाप, संदीप माने आदींसह संघटनेच्या सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

दिलेल्या निवेदनात आहे की, शालेय पोषण आहार कर्मचारी हे केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या योजने अंतर्गत काम करणारा महत्वाचा घटक आहेत. या कर्मचार्‍यांना अल्पसे मानधन असल्याने भूकमारीची वेळ आलेली आहे. मागील अनेक वर्षांपासून असा अन्याय होत आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अल्पशा मानधनावर कुटुंबासह जगणे हलाखीचे होत आहे. यासाठी तत्कालिन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एक हजार रुपयांची मानधन वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. आता या मानधनवाढीची पूर्तता करावी.

कर्मचार्‍यांना कूक कम शिपाई पदाचा शासकीय कर्मचारी दर्जा मिळावा. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच मानधन, पगार देण्यात यावा. शालेय पोषण आहारच्या कर्मचार्‍यावर शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक हे दडपण आणून आजही झाडलोट, शौचालय साफ करण्याचे काम लादत आहेत. ते बंद करावे. यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वायूसेनेचे राजस्थानमध्ये विमान कोसळले
पुढील बातमी
20 टन कोल्ड मिक्स ला सातारा शहरातील रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा

संबंधित बातम्या