सातारा : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. शंभूराज देसाई साहेब हे नवरात्रोत्सवातील नऊ दिवस पायातील चपलांचा त्याग करून उपवास पाळतात. गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी हे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे. यंदा नवरात्रोत्सवाच्या काळातच मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जनतेचे, विशेषतः शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. जनजीवन विस्कळीत झाले. या परिस्थितीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत व जामखेड तालुक्यातील बाधित क्षेत्रांचा दौरा केला. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेला धीर दिला. तसेच जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचे अतिवृष्टीमुळे पिकांच्या दृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाप्रमाणे कॅबिनेट मंत्र्यांचे बाधित क्षेत्रात दौरे सुरू झाले आहेत . राज्याचे पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड या दोन तालुक्यातील बाधित क्षेत्रांचा आढावा घेतला . या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी थेट बांधावर संवाद साधून त्यांना धीर दिला . तसेच या दौऱ्यात त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे सुरू करून लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या समाजसेवेचा वारसा जपला
दौऱ्यादरम्यान त्यांनी कोणतीही तमा न बाळगता दुचाकीवरून चिखलातून अनवाणी फिरत शेतकऱ्यांचा बांध गाठला. सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खंबीर आहे, असा विश्वास दिला. त्याचबरोबर नुकसानीच्या भरपाईसाठी पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही दिले. या काळातही त्यांनी ना चप्पल घातल्या, ना उपवास सोडला. त्याग, कष्ट, कर्तृत्व आणि भक्ती यांचा वारसा जपत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांना हा समाजकार्याचा वसा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडून मिळाला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या समाजसेवेचा वारसा मंत्री शंभूराज देसाई हे यशस्वीपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या संवेदनशिलतेबद्दल अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.