सातारा : सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटला तरी सातारा शहर परिसरातील खड्ड्यांची दुरुस्ती झालेली नाही. या निषेधार्थ डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने सातारा शहरात खड्यांभोवती महिलांनी फेर धरून आंदोलन केले तसेच लोककलेची परंपरा जपणाऱ्या पारंपारिक वासुदेवाने गोंधळी गीते सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
हे आंदोलन तहसीलदार कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर करण्यात आले. या आंदोलनात डेमोक्रॅटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, अविनाश तुपे, संदीप पवार, सविता रणदिवे, संगीता परदेशी, मीरा साठे, यश रणदिवे, प्रज्वल गायकवाड, ही पदाधिकारी उपस्थित होते .सातारा शहरातील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी ही या आंदोलना मागची मोठी भूमिका होती . मात्र सातत्याने पडणारा पाऊस आणि सातारा पालिकेने ड्ड्यांच्या दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष याचा निषेध डेमोक्रॅटिक पार्टीच्या वतीने करण्यात आला. पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्याभोवती फेर धरत पिपाणी वाजवली तर महिलांनी या खड्ड्यांच्या परिसरामध्ये फुगड्यांचा फेर धरला .काही वासुदेवांनी खड्ड्यांमध्ये उभे राहून गोंधळी गीते गायली.
या आंदोलनाविषयी बोलताना ऋषिकेश गायकवाड म्हणाले, सातारा शहर परिसरातील खड्डे दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने डेमोक्रॅटिक पक्षाचे आंदोलन या पद्धतीने सुरूच राहणार आहे. सातारकरांना सातारा नगरपालिकेने पायाभूत सुविधा द्याव्यात या अपेक्षा आहेत शहरातील रस्ते खड्डे मुक्त असावेत आणि दळणवळण सुलभ व्हावे ही अपेक्षा असताना पालिकेच्या बांधकाम विभागाने खड्डे दुरुस्ती कडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तसेच पावसाने सुद्धा उघडीप दिली आहे. त्यामुळे हे खड्डे तात्काळ दुरुस्त व्हावेत अन्यथा याहीपेक्षा मोठे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला .