सातारा : महाराष्ट्र राज्य विज्ञान शैक्षणिक संस्था रवीनगर नागपूर, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा आणि यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2023 -24 आणि 2024 -25 या वर्षातील एकूण 320 उपकरणांचे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन सोमवार (दि. 17) ते बुधवार दि.19 नोव्हेंबर दरम्यान यशोदा टेक्निकल कॅम्पस वाढे फाटा सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी इ. सहावी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी तसेच त्यांच्यामधील वैज्ञानिक कौशल्य विकसित करण्यासाठी इन्स्पायर अवॉर्ड च्या माध्यमातून वैज्ञानिक प्रयोगांचे नॉमिनेशन ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाते. त्यामधून निवड झालेल्या झालेल्या विद्यार्थ्यास त्याच्या अकाउंटवर प्रयोग कृती करण्यासाठी दहा हजार रुपये पुरस्कार मूल्य केंद्रशासनाच्या वतीने दिले जाते.
सातारा जिल्ह्यातील मागील दोन वर्षातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले वैज्ञानिक मॉडेल या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन स्थळी मांडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच समाजातील विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, विस्तार अधिकारी गिरी, विज्ञान पर्यवेक्षक साईनाथ वाळेकर आणि जिल्हा इन्स्पायर अवॉर्ड समन्वयक लक्ष्मण उबाळे यांनी याप्रसंगी केले आहे.