येत्या महिन्याभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो'; पृथ्वीराजबाबांचा मोठा दावा, दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय चर्चांना उधाण

by Team Satara Today | published on : 01 December 2025


​कराड :  ​अमेरिकेतील 'एपस्टाईन फाईल्स' (Epstein Files) वरून सध्या जागतिक राजकारणात वादळ उठले असतानाच, याचे पडसाद आता भारतातही उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये बोलताना "कदाचित महिन्याभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो," असे खळबळजनक आणि सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हा "बॉम्ब" टाकला. ते म्हणाले, "अमेरिकेत गेल्या ६ महिन्यांपासून एपस्टाईन फाईल्सवरून गदारोळ सुरू आहे. सुमारे १० हजार पानांची ही फाईल अमेरिकन संसदेने ताब्यात घेतली असून, ती लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. या फाईलमध्ये जगातील अनेक बड्या उद्योगपती आणि राजकारण्यांची नावे असण्याची शक्यता आहे. जर ही फाईल उघड झाली, तर भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो."

​यावेळी चव्हाण यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या एका व्हिडिओचाही संदर्भ दिला, ज्यामध्ये स्वामींनी लवकरच कागदपत्रे मिळण्याचा दावा केला आहे. यामुळे देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा अंदाज चव्हाण यांनी वर्तवला.

​तो 'मराठी माणूस' कोण? बाबांनी मारली मिश्कील कोपरखळी!

तुम्ही 'मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो' असे म्हणत असतानाच ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना टॅग केले आहे, मग नेमका तो चेहरा कोण? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, पृथ्वीराजबाबांनी आपल्या खास शैलीत "ते आता तुम्हीच शोधा," असे मिश्कील उत्तर दिले.

​निवडणूक आयोगावर सडकून टीका

यावेळी चव्हाण यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरही जोरदार प्रहार केला. "निवडणूक आयोगाने सगळा गोंधळ घालून ठेवला आहे. जर तयारी नव्हती, तर निवडणुका घेण्याची गडबड कशासाठी केली? ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, हा सगळा पोरखेळ झाला आहे," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचारसभेत प्रलोभने दाखवत असून, आचारसंहिता फक्त नावापुरतीच उरली आहे का? आयोग सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

​या पत्रकार परिषदेला अजितराव पाटील-चिखलीकर, कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, शहराध्यक्ष अमित जाधव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात दोन्ही राजांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; जिल्ह्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आज मतदान, उद्या निकाल
पुढील बातमी
एच.आय.व्ही संसर्गितांना सन्मानाची वागणूक द्या - न्या. नीना बेदरकर; एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

संबंधित बातम्या