सातारा : गेले दोन दिवस हलक्या स्वरूपात पडणार्या अवकाळी पावसाने सलग दुसर्या दिवशी मंगळवारीही सातार्याला झोडपून काढले. सायंकाळी सव्वा सहा पासून वादळी पावसाने सातारकरांची दैना उडवली. कास-यवतेश्वर रस्त्यावर एक मोबाईल टॉवर चारचाकी वाहनावर पडून एकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसापासून सातारा शहर व परिसरात वळीवाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे.
सोमवारी रात्रीही पावसाचे जोरदार स्वरूपात आगमन झाले होते. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे तसेच सायंकाळपासून पावसाची चिन्हे दिसू लागल्यामुळे सातारकरांनी आपले व्यवहार आटोपते घेतले होते. मेघगर्जनेसह जोराचा वारा आणि सायंकाळी सहानंतर काळोख पसरलेल्या वातावरणातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे सातारकरांना अधिकच भीतीचे वातावरण वाटत होते. त्यातच जोराचा पाऊस सुरू झाल्यावर रस्त्याच्या मधोमध वाहणारे पाण्याचे लोट अक्षरशः धडकी भरवणारे ठरत होते. कास रस्त्यावर यवतेश्वर परिसरात मोबाइल टॉवर सायंकाळी कोसळल्याने वाहनाचे नुकसान होऊन एकजण जखमी झाला. सातारा तालुका पोलीस व ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी जात वाहतूक सुरळीत केली.
सायंकाळच्या वेळेस सुरू झालेल्या या पावसामुळे चाकरमान्यांना घरी परतताना अक्षरशः आडोसा शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. संपूर्ण मुख्य रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत होते. शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत या पावसाने मोठे विघ्न निर्माण झाले. एकंदरीतच हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत येणारा आणि परिसरात पिकणारा देशी आंबाही मोठ्या प्रमाणात शेतात गळून पडल्याचे चित्र आहे. राजवाडा परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक व गोडोली तसेच जगतापवाडी (शाहूनगर) येथे पाणी रस्त्यावर येऊन गटारे तुंबण्याचे प्रकार घडले. एकंदरीतच वळीवाच्या या मुसळधार पावसाने सातारकरांची दैना उडवली.