जुने नवे काही नाही, आपण सर्वजण एक आहोत; एकदिलाने काम करून निवडणुका जिंकण्याचे शिवेंद्रसिंहराजे यांचे आवाहन
सातारा : भाजपामध्ये नवा जुना असा कोणताही वाद नाही. पक्ष संघटना म्हणून सगळेच एक आहोत. लोकसभेला, विधानसभेला तुम्ही आमच्यासाठी काम केलेत. आम्हाला निवडून दिलेत. आता तुमची निवडणूक आहे. तुमच्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधींना काम करायचे असून पळावे लागणार आहे, असे स्पष्ट मत मांडत राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी कुठलाही वादविवाद न करता ही निवडणूक लढवायची आहे. जिंकायची आहे. पुढे कोणीही विरोधक असेल, असे आदेश त्यांनी दिले.
हॉटेल लेक व्हयू च्या लॉनवर भाजपाच्या नगरविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अविनाश कदम, अमोल मोहिते, भालचंद्र निकम, सुवर्णा पाटील, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब निकम, दत्ताजी थोरात, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकद लावली. त्यामुळे आपण लोकसभा घेतली. स्वातंत्र्यानंतरचा पहिला भाजपाचा खासदार ताकदीने आपण निवडून आणला. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत सुद्धा राष्ट्रवादीचा गड होता तो भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. हे श्रेय माझ्या एकट्याचे नाही. तुमच्या सगळ्याचे आहे. अगदी अर्ज भरण्यापासून मतमोजणीपर्यंत कोणी नाही म्हणत नव्हत. पत्रकार सुद्धा सांगत नव्हते. शेवटी मतदारांनी उदयनराजेंना खासदार केले. देशात आणि राज्यात सरकार आपले आले. देवेंद्र फडणवीस यांना सातारा जिल्ह्याने ताकद दिली. पक्षाने परत फेड केली. जिल्ह्यात भाजपचे दोन मंत्री दिले. एक जयकुमार गोरे आणि मी . म्हणजेच आपल्या जिल्ह्यावर वरिष्ठांचे लक्ष आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. निवडणूका पुढे पुढे चालल्या होत्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारीच्या आधी निवडणूका घ्यायच्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात आचा संहिता लागेल, तशी घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार म्हणून माझी पाचवी टर्म आहे. मला मंत्रीपद दिले. बांधकाम खाते दिले. सातारला दिले हे सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगत ते म्हणाले, या निवडणूका कशा लढवायच्या हे लक्षात घेतले पाहिजे. त्यावेळेचे राजकारण निवडणूकाना कसे सामोरे जायचे, हे वेगळे होते आता आपल्याला मार्गदर्शन करणारे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांच्या सुचनेनुसार खासदार श्री. छ. उदयनराजे यांचे पदधिकारी आणि माझे पदाधिकारी असा सगळयांचा एकत्रित विचार करुन निर्णय योग्य पद्धतीने होतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तिसरी आघाडीही होण्याची शक्यता?
समोर कोण असेल, उद्या राष्ट्रवादीचे पॅनेल असेल काय आहे. शिवसेनेने पॅनेल टाकले तर त्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकनष्ठि राहिले पाहिजे. तिसरी आघाडी पण होण्याची शक्यता आहे. आपल्या या सर्व आव्हानांना तोंड द्यायचे आहे आणि लढायचे आहे. भले मी म्हणतो ताकद कमा की जास्त हा विषय बाजूला ठेवून निवडणूकीत आपल्यासमोर आव्हान असणार आहे, त्यास तोंड द्यायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इच्छूकांना दिला सल्ला
शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले येथे अनेक इच्छूक उमेदवार आले आहे. पालिकेला अध्यक्षपद ओपन असल्याने इच्छूकांची संख्या जास्त असणार आहे. आपल्याला त्याही आव्हानाला तोंड द्यायचे आहे. त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे सगळ्याच इच्छूकांना विनंती आहे. आपल्या प्रभागातील जेष्ठ मंडळी आहेत.ज्यांना निवडणुकीत उभे रहायचे आहे त्यांनी आपल्या प्रभागात नागरिकांना भेटा, तरुण पिढी किती पाठी आहे त्याचा अंदाज घ्या, असा सल्ला त्यांनी इच्छूकांना दिला.
पुढे ते म्हणाले, भाजपात नवा जुना असा कोणताही भेदभाव भाजपा नाही. त्यामुळे कुठे एकामेकात वेगळी चर्चा करुन वेगवेगळया अफवा काही उठवू नका. सुवर्णाताई शाळेत आमच्या अगोदर तुम्ही आला असला आणि आम्ही उशीरा आलो असलो तरीही आपण एकच आहोत. त्यामुळे आपल्याला जिल्हा आणि सातारा जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची आहे. भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. मी पदावर आहे, असे कोणी म्हणून चालणार नाही. सर्वानी आपल्या प्रभागात, आपल्या गावात काम केले पाहिजे. आपल्याला सर्व जाती धर्माचे उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मग तो मराठा असू देत, ओबीसी असू देत किंवा मुस्लिम असू द्यात, सर्व समाजाचे प्रतिनिधी निवडून आणायचे आहेत. तरुणांना संधी मिळाली पाहिजे. माझी पण इच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सातारा नगरपालिकेचे प्रशासक सगळयांचे बाप
प्रशासकीय कारभार चालवणे सोपं नाही. मंत्रालयात प्रशासक होत, झेडपीत आहे. पंचायत समितीत आहे. तसेच नगरपालिकेतही प्रशासक आहे. नगरपालिका छोटी असली तरी सगळ्यांचे प्रशासक बाप आहे. त्यांना खाणाखुणा माहिती आहेत, असे मंत्री शिवेंद्रराजेंनी प्रशासक अभिजीत बापट यांचे कौतुक केले. उमेदवार देताना एक अधिकृत एक स्पेअरला असे होणार नाही. ज्यांना संधी मिळेल त्यांच, त्यांच्याबरोबर सगळयांनी काम केले पाहिजे. जे समोर आव्हान असेल त्यास फेस केले पाहिजे, असे सांगत मंत्री शिवेंद्रराजे यांनी पत्रकार बंधूना आर्वजून मला सांगायाचे आहे ही बैठक कोणाच्या विरोधात नाही. या बैठकीत राजकीय काही ठरवायचे नाही. बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. ही बैठक कोणाच्या विरोधात कुरघोड्या करायला घेतली नाही, अशी त्यांनी विनंती केली.