वडूज : "समाज आणि प्रशासन यांनी हातात हात घेऊन काम केल्यास आणि त्यांच्यातील संबंध अधिक सौहार्दपूर्ण झाल्यास समाजातील सर्व घटकांचा न्यायपूर्ण विकास होईल. त्यासाठी सर्व जबाबदार घटकांनी राज्यघटनेच्या चौकटीत राहून समाजाभिमुख उपक्रमशीलता दाखवणे गरजेचे आहे", असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, संस्कृती कला मंचचे अध्यक्ष यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच कर्मचारी महिलांसाठी संस्कृती कला मंचतर्फे आयोजित निबंध आणि कविता स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षाराणी ओमासे, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले," प्रशासन आणि समाज यांच्यामधील दरी दूर होणे आवश्यक आहे.
प्रशासन अनेक विकासाच्या योजना राबवत असते या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कल्पनाशक्तीचा अवलंब करून चौकटीबाहेर तथापि; राज्यघटनेच्या नियमांच्या अधीन राहून काम करणे गरजेचे आहे. प्रशासनाचा मानवी चेहरा समाजाला अधिक समृद्ध करून जाईल. कर्मचाऱ्यांचे कलागुण प्रकाशात आल्यास त्यांचाही नेहमीचे काम करण्याचा आनंद द्विगुणीत होईल. प्रशासन आपलेच आहे; असा विश्वास निर्माण होण्यासाठी कर्मचारी आपल्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन समाजाशी नाते अधिक घट्ट करू शकतात. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती हवी आणि समाजाची साथ देखील हवी. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि कर्मचारी भगिनी यांनी अत्यंत अर्थपूर्ण आणि दर्जेदार निबंध लिहून चौफेर वैचारिक समाजशीलतेचा परिचय दिला आहे. हीच वैचारिक प्रागतीकता आणि वैचारिक प्रगल्भता समाजाला प्रशासनाशी अधिक घट्टपणे जोडून घेईल. " विविध स्पर्धा तसेच उपक्रम शासकीय कर्मचाऱ्यांना मानसिक बळ देतात असे मत त्यांनी नोंदविले.
मंगेश लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका पूजा गायकवाड यांनी आभार मानले.